PMC News: पालिकेच्या तिजोरीला २ कोटींचा चुना! अधिकाऱ्याचा ‘हा’ हलगर्जीपणा महापालिकेला पडला महाग
PMC News: मुदत संपलेल्या ठेवी महिनाभर बचत बँक खात्यात पडून राहिल्याने महापालिकेचे २ कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान.

PMC News – उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिका वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असते. पालिकेची रक्कम बँकांमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवताना अधिकाऱ्याने दाखवलेला हलगर्जीपणा नडला आहे. मुदत संपलेल्या ठेवी महिनाभर बचत बँक खात्यात पडून राहिल्याने पालिकेचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याला आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत १,२५० कोटींच्या पाच मुदत ठेवी ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या तिजोरीत शासकीय अनुदान, नागरिकांनी भरलेला कर तसेच ठेकेदारांची अनामत या रुपाने मोठी रक्कम जमा होते. यातील पाच हजार कोटींपेक्षा अधिकची रकम ठेवीच्या रुपाने विविध बँकांमध्ये ठेवली आहे. मे महिन्यात एका ठेवीची मुदत संपली होती.
त्याआधीच ठेव नुतनीकरणाचा प्रस्ताव तयार करून मान्यता घेणे आवश्यक होते. मात्र, मुदत संपल्यानंतर १५ दिवसांनी वित्त आणि लेखा विभागाने याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्याकडे दिला. मुदत ठेवीचे नुतनीकरण न झाल्याने एक जूनपर्यंत एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे कौर यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली.
आयुक्तांनी लेखा आणि वित्त अधिकारी उल्का कळसकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावून ठेवीचे वेळेत नुतनीकरण का झाले नाही, अशी विचारणा केली. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनीही याप्रकरणी प्रशासनामुळे नुकसान झाल्याचे कबूल केले. स्थायी समितीच्या बैठकीत २१० कोटी, १५० कोटीच्या दोन आणि ३५० कोटी रुपयांच्या दोन अशा एकूण १२५० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी बँकेत ठेवण्यास मान्यता देण्यात आली.
सरकारी धोरणानुसार आयुक्तांना ७० टक्के आणि स्थायी समितीला ३० टक्के ठेवी बँकेत ठेवण्यासाठी सूचना करता येतात. त्यानुसार स्थायी समितीने १५० कोटीच्या दोन आणि २१० कोटीची एक अशा तीन ठेवी ठेवण्यास मान्यता दिली. आयुक्तांनी ३५० कोटीच्या दोन ठेवी ठेवण्यास मान्यता दिली.





