Kothrud Pipeline Burst: पुन्हा तोच निष्काळजीपणा! खोदकामात जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया
Kothrud Pipeline Burst: कोथरूडमधील डुक्कर खिंड येथील इताशा सोसायटीजवळ महावितरणच्या कामादरम्यान मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया.

Kothrud Pipeline Burst – शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट असताना, विविध प्रशासकीय विभागांच्या बेजबाबदार आणि हलगर्जी कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे प्रकार वारंवार घडत आहे. शनिवारी (दि. १३) कोथरूड परिसरातील डुक्कर खिंड येथील इताशा सोसायटीजवळ महावितरण विभागाकडून सुरू असलेल्या खोदकामादरम्यान जलवाहिनी फुटल्याची घटना घडली. त्यामध्ये हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले असून, त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे.
दुपारी चारनंतर ही जलवाहिनी फुटल्यामुळे वेदभवन, स्वामी विवेकानंद कॉलनी आणि आसपासच्या संपूर्ण परिसराचा पाणीपुरवठा तातडीने बंद करावा लागला. महावितरण विभागाच्या या हलगर्जीपणामुळे जलवाहिनी फुटली, ती दुरुस्तीसाठी काही तास जाणार, तोपर्यंत या परिसरातील पाणीपुरवठा बंद केला असून, काम पूर्ण झाल्यावर कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले. आधीच उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले आहेत.
महापालिकेनीही सम-विषम तारखेला पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. चार दिवसांपूर्वीच कोथरूडमधील भुसारी कॉलनी परिसरात पावसाळी लाईनच्या कामादरम्यान अशीच जलवाहिनी फुटली होती. या घटनेतून कोणताही धडा न घेता प्रशासनाकडून पुन्हा तीच चूक करण्यात आली.
शहरात पाण्याचा एक-एक थेंब महत्त्वाचा असताना, शासकीय यंत्रणांच्या अशा हलगर्जीपणामुळे नागरिक संतापले आहेत. अशा प्रकारे वारंवार सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि पाणी वाया घालवणाऱ्या संबंधित कंत्राटदार व दोषी विभागावर प्रशासनाने आता केवळ नोटीस न बजावता थेट कडक कायदेशीर कारवाई, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.




