PMC News: महापालिकेत मोठी खळबळ! ‘त्या’ एका मेसेजमुळे बडा अधिकारी निलंबित..नेमकं काय घडलं?
PMC News: महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ५६ (२) (फ) नुसार विभागीय चौकशी सुरू; आयुक्तांच्या परवानगीशिवाय पुणे सोडण्यास मनाई.

PMC News – पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अशित वेदप्रकाश जाधव यांना मनपा सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या स्वाक्षरीने हा निलंबन आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात निलंबनाचे कारण स्पष्ट केले नसले, तरी राजकीय दबाव आणि महापालिका आयुक्तांना केलेला एक मेसेज कारणीभूत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा विभागात किंवा महापालिकेत नेमके काय घडले, याची उलटसुलट चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. दिनांक ११/०७/२०२६ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने जाधव यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे नायर यांनी दिलेल्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे; परंतु ११ जुलैला नेमके असे काय घडले, जाधव यांनी आयुक्तांना काय मेसेज पाठवला, त्यात मजकूर काय होता, ज्यामुळे जाधव यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले,
याचा उल्लेख निलंबनाच्या आदेशात करण्यात आलेला नाही. आदेशात केवल महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ५६ (२) (फ) नुसार त्यांच्यावर विभागीय चौकशीच्या आधीन राहून ही कारवाई करण्यात आली असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, या कारवाईबाबत महापालिकेमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार अवघ्या दीड महिन्यांपूर्वीच जाधव यांची पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली होती. मात्र, या बदलीवर ते प्रचंड नाराज होते.
याच नाराजीतून ते महिनाभराच्या प्रदीर्घ रजेवर गेले होते. एक जुलै रोजी ते पुन्हा सेवेत रुजू झाले; परंतु आपल्याला पाणीपुरवठाऐवजी बांधकाम किंवा पथ विभागामध्येच बदली मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. येनकेन प्रकारेण ही बदली पदरात पाडून घेण्यासाठी जाधव यांनी एवढा आटापिटा केला, की त्यांनी आयुक्तांवर थेट राजकीय दबाव आणायला सुरुवात केली. त्यानंतरही आयुक्त बधले नाहीत, म्हटल्यावर जाधव यांनी महापालिका आयुक्तांना केलेल्या मेसेजमध्ये आक्षेपार्ह आणि अयोग्य भाषा वापरली. त्यातून दिसलेल्या त्यांच्या निर्ढावलेपणामुळे आणि गंभीर वर्तणुकीमुळे त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याचेही बोलले जात आहे.
महापालिका हद्द सोडण्यास बंदी
अतिरिक्त आयुक्तांनी काढलेल्या निलंबनाच्या आदेशात अशित जाधव यांच्याविरुद्धची खातेनिहाय चौकशीची कारवाई पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी तातडीने पूर्ण करावी, तसेच महापालिका आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय जाधव यांना महापालिकेचे हद्दीक्षेत्र सोडता येणार नाही, असेही म्हटले आहे.






