PMC News : महापालिकेची तिजोरी ताब्यात असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची जोरदार स्पर्धा आहे. भाजपकडून मागील सभागृहाचे कामकाज सांभाळणारे पक्ष गटनेते गणेश बिडकर यांनाच पुन्हा गटनेते म्हणून नियुक्त केल्याने सभागृहनेते म्हणून तेच जबाबदारी सांभाळणार हे नक्की. त्यामुळे बिडकर हे स्थायी समितीच्या रेसमधून बाहेर पडले असून आता अध्यक्षपदासाठी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक अनिल टिंगरे तसेच राजेंद्र शिळीमकर यांच्यात चुरस असल्याची चर्चा आहे.धीरज घाटे यांच्याकडे शहराध्यक्षपद आहे. त्यामुळे पक्षाकडून एक व्यक्ती, एक पद या धोरणानुसार घाटे यांना संधी दिली जाईल की नाही याबाबत पक्षाच्या वर्तुळात वेगवेगळे तर्क लढविले जात आहे. घाटे यांना संधी द्यायची झाल्यास पक्षाला शहराध्यक्ष बदलावे लागणार असल्याचेही बोलले जात आहे.महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपची एकहाती सत्ता आहे. अशा स्थिती महापालिकेतील महापौरपदानंतर स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेता ही दोन्ही पदे महत्त्वाची आहेत. त्यात स्थायी समिती महापालिकेचा सर्व आर्थिक डोलारा सांभाळते. श्रीनाथ भिमाले-धीरज घाटे सभागृह नेत्यांकडून सर्व पक्षांशी समन्वय ठेवून सभागृहात फ्लोर मॅनेजमेंट केले जाते. अशा स्थितीत ही दोन्ही पदे महत्त्वाची, तसेच अनुभवी नगरसेवकांना पक्षांकडून दिली जातात. त्यामुळे पक्षाने सभागृह नेतेपदाची जबाबदारी पुन्हा गणेश बिडकर यांच्याकडे दिली आहे. आता स्थायी समितीच्या स्पर्धेतून बिडकर बाहेर पडल्याने इच्छुकांनी स्थायी अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. पाचजणांना मिळणार संधी ? स्थायी समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. सर्वसाधारणपणे दरवर्षी अध्यक्षपद बदलेले जाते. मात्र, मागील वर्षी भाजपकडून चारच जणांना संधी देण्यात आली. त्यात, तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान खासदार मुरलीधर मोहोळ, योगेश मुळीक, सुनील कांबळे आणि हेमंत रासने यांचा समावेश होता. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत सुनील कांबळे हे आमदार झाल्याने त्यांना अंदाजपत्रक सादर करता आले नाही. तसेच अध्यक्षपद मध्येच सोडावे लागले. त्यानंतर महापालिकेचा कार्यकाळ संपेपर्यंत आमदार हेमंत रासने यांच्याकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद होते. यंदा पक्षाचे ११९ नगरसेवक निवडून आल्याने तसेच पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने पाच वर्षात पाच स्थायी समिती अध्यक्ष नेमण्याचे धोरण असल्याचे सूत्रांकडून सांंगण्यात आले.