१. राज्यात १५ हजार १५,९३१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात राज्यातील २९ महापालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकीत २,८६९ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी १५,९३१ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईमध्ये २२७ जागांसाठी १७०० उमेदवार रिंगणात आहेत. त्या पाठोपाठ १६५ जागांच्या निवडणुकीत ९६८ उमेदवारांनी माघार घेऊन देखील ११६६ उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वात कमी २३० उमेदवार इचलकरंजीमध्ये असून तेथे ६५ जागांसाठी मतदान होत आहे. इचलकरंजी आणि जालना महापालिकेत पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे २९ महापालिकांसाठी एकूण ३३,४२७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील २४,७७१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. ८,८४० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. २. लाखो रुपयांची थकबाकी असूनही उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्र? महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पालिकेच्या कर विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. नियमांचे उल्लंघन करून चक्क लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर क्षेत्रीयांतर्गत परिसरातील उमेदवारांच्या नावावर महापालिकेची २०१७ पासून जवळपास आठ वर्षांपासूनची एकूण ३४ लाख ६५ हजार १६० रुपये थकबाकी असून अभय योजनेनुसार लाभ देऊन सुमारे १६ लाख ८० हजार ७८७ रुपयांची कर थकबाकी येणे असल्याचे कर मागणी पत्रातून स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे सदर थकबाकीदार निवडणूक रिंगणात असून अर्ज छाननी प्रक्रियेत ते उमेदवार पात्रही ठरले आहेत. ३. महापालिकेत सत्ता द्या, पुणे आणि पिंपरी चिंचवड बारामतीसारखं करतो – अजित पवार वाहतूक कोंडीत जगामध्ये चौथा क्रमांक, खड्डयांचे रस्ते, कचर्याचे साम्राज्य, हवा आणि पाण्याचे प्रदूषणाचे शहर अशी पुण्याची ओळख मागील ९ वर्षे महापालिकेतील सत्ताधारी ‘त्रिकुटा’ने केली. ही ओळख बदलण्यासाठी ‘कारभारी’ बदला. माझ्या हातात सत्ता द्या, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड बारामतीसारखे करून दाखवतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरून होत असलेल्या टीकेवरही उत्तर दिले. एखाद्याच्या पतीने गुन्हा केला म्हणून त्याची पत्नी व कुटुंबीयांना गुन्हेगार ठरविणे योग्य नसल्याचे सांगत टीकाकरांना प्रत्युत्तर दिले. ४. दीडशे अपक्षांना चिन्ह वाटप! काहींना मिळाली बॅट तर काहींच्या हाती कपबशी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होत असून, अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल १४९ अपक्ष उमेदवारांना विविध चिन्हे देण्यात आली आहेत. कुणाच्या हाती क्रिकेटची बॅट तर कुणाच्या हाती कपबशी, कुणाला शिडी, छत्री, पतंग, टॉर्च, गाडी अशी विविध चिन्हे मिळाली असून, या चिन्हांच्या आधारे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अपक्ष उमेदवार सज्ज झाले आहेत. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसोबतच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने अनेक प्रभागांमध्ये हायव्होल्टेज लढती होण्याची चिन्हे आहेत. ५. श्रेय चोरणारी टोळी मुंबईत सक्रीय; फडणविसांचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सभा घेऊन भाजपा-महायुतीने प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार टीकाही केली. “मला तर लक्षात आलं की श्रेय चोरणारी टोळी मुंबईत सक्रीय आहे. काही अबोध बालकं आहेत ती म्हणतात सगळं आम्हीच केलं. अर्ध्या रात्रीत मुंबईकरांना विचारलं तरीही मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं. विकासाच्या प्रत्येकात खोडा कुणी घातला हे मुंबईकरांना विचारलं तर ते एकच नाव घेतील ते म्हणजे माननीय उद्धव ठाकरे. निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते. मुंबई कुठेही सरकत नसते, तुमची बुद्धी सरकते आहे,” असा टोला फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लगावला. तसेच त्यांनी मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसवायचा असल्याचे सांगितले. ६. हवामान बदलामुळे थंडीची लाट ओसरली हवामान बदलामुळे शहरासह जिल्ह्यातील थंडीची लाट ओसरली आहे. गेल्या ४८ तासांत किमान तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे पारा १२ अंशाच्या पुढे गेला. परिणामी थंडीचा जोर कमी झाला असून, ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव पाहायला मिळत आहे. नवीन वर्षात थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. मात्र हवामानातील बदलामुळे मागील तीन ते चार दिवसांत किमान तापमनात लक्षणीय घट झाली आहे. त्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. ७. हृदयविकाराच्या झटक्याने शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू पालघरमध्येही हृदयविकाराच्या झटक्याने एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तलासरीच्या वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमधील धक्कादायक प्रकार घडला. रोशनी रमेश गोस्वामी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. शाळेच्या क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेली ही विद्यार्थिनी इयत्ता दहावीत होती. मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्यानंतर अवघ्या काही वेळातच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. ८. राहुल गांधी हे ‘पार्ट टाइम’ नेते; भाजप नेत्याची टीका भाजपाचे नेते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी आता ‘लीडर ऑफ पर्यटन’ झाले आहेत” असा टोला पूनावाला यांनी लगावला. शहजाद पूनावाला म्हणाले की, राहुल गांधी कधीही ‘वर्क मोड’मध्ये नसतात, त्यांना फक्त सुट्यांमध्ये राहायला आवडतं. आता तर ते कायमस्वरूपी सुटीच्या मूडमध्ये दिसतात.” पुढे ते म्हणाले, “नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते देशाचे पंतप्रधान होईपर्यंत सतत ‘वर्क मोड’मध्ये आहेत. जेव्हा बिहार निवडणुका सुरू होत्या, तेव्हा राहुल गांधी जंगल सफारीचा आनंद लुटत होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होतं की, राहुल गांधी हे ‘पार्ट टाइम’ नेते आहेत. तसेच ते आपल्या परदेश दौऱ्यात कोणाकोणाला भेटतात हे देशाला सांगायला हवं,” असेही पूनावाला म्हणाले. ९. २०२६ ठरणार निर्णायक! ५ राज्यांमध्ये होणार विधानसभा निवडणूक पुढील काही महिन्यात देशात ५ राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. आसाम, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या ५ राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. मार्च-एप्रिलमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी यांचं सरकार आहे. मार्च-एप्रिल महिन्यात आसामच्या निवडणुका होऊ शकतात. येथे सध्या हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. तामिळनाडूमध्ये सध्या एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रविड मुन्नेत्र कळघम यांचं सरकार आहे. केरळमध्ये पिनारायी विजयन यांच्या डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार असून येथे सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले जात आहे. तर ऑल इंडिया एनआर काँग्रेस आणि भाजप यांचं सरकार सध्या पुद्दुचेरीमध्ये आहे. येथे काँग्रेसकडून सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी केले जात आहे. १०. अमेरिका-व्हेनेझुएच्या संघर्षात किम जोंग उन यांचा कठोर इशारा अमेरिकेच्या तीन सैन्या दलांनी ऑपरेशन मिडनाईट हॅमर सुरू करत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेतलंय. यावर उत्तर कोरियाचे किम जोंग-उन यांनी मादुरो हे आपले ‘मित्र’ असल्याचं सांगत उघडपणे अमेरिकेला महायुद्धाचा इशारा दिला. किम जोंग-उन यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन नेतृत्वाकडे मागणी केली आहे की, त्यांनी तातडीने निकोलस मादुरो यांची सद्यस्थिती जाहीर करावी. मादुरो हे आपले मित्र आहेत. अमेरिकेचं हे पाऊल जागतिक संघर्षाला जन्म देऊ शकतं. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांची लगेचच सुटका करावी, त्यांना तातडीने सोडा अन्यथा याचे गंभीर आंतरराष्ट्रीय परिणाम होतील असा इशारा किम जोंग-उन यांनी दिलाय. रशियानेही अमेरिकेच्या या कारवाईचा कडक शब्दांत निषेध केला.