PMC News – महापालिकेकडून शहरात पावसाळ्यापूर्वीची रस्ते खोदाईची दुरूस्ती १ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे, महापालिकेच्या पाणी पुरवठा, विद्युत तसेच ड्रेणेज विभागाने आवश्यक असलेली खोदाईची कामे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावीत. त्यानंतर केवळ अत्यावश्यक कामांनाच खोदाई कामास परवानगी दिली जाणार असल्याच्या सूचना पथ विभागाने या विभागांना केल्या आहेत. याबाबत नुकतीच बैठक झाली असून त्यात या सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या पथ विभागाकडून शहरात ड्रेणेज, पाणीपुरवठा, पावसाळी वाहिन्या, पोलीस प्रशासन, महाप्रीत, एमएनजीएल तसेच खासगी मोबाइल कंपन्यांकडून रस्त्यांची खोदाई केली जाते. महापालिकेकडून शुल्क आकारून या खोदाईस मान्यता दिली जाते. त्यानंतर रस्ते दुरूस्त करण्याची जबाबदारी महापालिकेच्या पथ विभागास देण्यात आली आहे. त्यामुळे पथ विभागाकडून दरवर्षी १ मे ते पावसाळा सुरू होईपर्यंत रस्त्यांची दुरूस्ती केली जाते. त्यामुळे, प्रशासनाने या सर्व विभागांनी पथ विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार पुढील दिड महिन्यात खोदाईची कामे तातडीने संपविण्याच्या सूचना पथ विभागाने केलेल्या आहेत. तसेच १ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत सेवा वाहिन्या टाकण्यासाठी कोणत्याही विभागाला किंवा संस्थेला परवानगी दिली जाणार नाही, या कालावधीत खोदाई करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा इशाराही पथ विभागाकडून देण्यात आला आहे. रस्ते तसेच राहणार… महापालिकेकडून मागील वर्षीही ३० एप्रिल पर्यंतच खोदाईस परवानगी दिली होती. त्यानंतर १ मे पासून रस्ते दुरूस्ती केली जाणार होती. मात्र, प्रशासनाकडून तातडीच्या खोदाईच्या नावाखाली ही मुदत १५ मे पर्यंत आयत्या वेळी वाढविण्यात आली. तर, दुसरीकडे शहरात ८ मे पासूनच पूर्वमोसमी पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर पुढे मान्सून येईपर्यंत पावसाळा सुरू झाल्याने महापालिकेस पावसाळ्यात रस्त्यांची दुरूस्ती करण्याची वेळ आली होती. मात्र, मागील वर्षाचा अनुभव असतानाही महापालिकेने पुन्हा यावर्षी तोच निर्णय घेतल्याने पाऊस लवकर आल्यास रस्ते तसेच राहण्याची शक्यता आहे.