Maharashtra Weather : मान्सूनने घेतला निरोप, पण संकट टळले नाही! हवामान खात्याकडून ‘या’ भागांना पावसाचा अलर्ट

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) भारतातून माघारी परतले आहे. त्यामुळे राज्यात हवामान कोरडे तर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जजनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असून, उकाडाही वाढला आहे.यंदा परतीचा पावसाने मराठवाड्यासह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत केले. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी परतीचा मान्सून महाराष्ट्रातून तर आज संपूर्ण भारतातून माघारी गेला आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुढील मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी (दि. १६) राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड या राज्यांत मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
विदर्भात मात्र हवामान कोरडे असल्याने कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली. परिणामी उन्हाचा चटका वाढला. पुढील २४ तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली.





