PMC News – शहरातील पदपथ एकसारख्या उंचीचे आणि एकसारख्या रंगसंगतीचे असावेत, यासाठी महापालिकेकडून शहरात विशेष पदपथ मोहीम सुरू करण्यात आली आहे. याशिवाय मार्चअखेरीस केल्या जाणाऱ्या अनावश्यक कामांच्या खर्चाला लगाम बसावा, यासाठी आयुक्तांकडून स्थायी समितीत १ मार्चनंतर कोणत्याही निविदा मान्यतेसाठी ठेवू नयेत असे आदेश दिले होते. मात्र, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या प्रभागातील कामाचा प्रस्ताव येताच महापालिका आयुक्तांना आपल्याच आदेशाचा विसर पडला असल्याचे गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत समोर आले आहे. प्रभाग क्र. २८ सॅलसबरी पार्क येथील इरावती कर्वे ते यशवंतराव भिमाले गार्डन याअंतर्गत रस्त्यावरील पदपथावर डेकोरेटिव्ह विद्युत कर्विंग ब्लॉक्सची (एलईडी लाइट्स) दुरुस्ती व नव्याने ब्लॉक्स बसविण्यासाठी तब्बल ४८ लाख ९८ हजार रुपयांची निविदा गुरुवारी आयत्या वेळी मान्यतेसाठी ठेवत मंजूरही करण्यात आली आहे. या कामासाठी दोन निविदा आल्या होत्या. त्यापैकी शांती इलेक्ट्रिकल्सची निविदा ०.१९ टक्के कमी होती, तर फ्लॅश एंटरप्रायझेसची निविदा १.१ टक्के अधिक दराने होती. प्रशासनाने तडजोड केल्यानंतर शांती इलेक्ट्रिकल्सने दोन टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविली. प्रशासनाने आज ऐनवेळी बैठकीपुढे ही निविदा मान्यतेसाठी ठेवली. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या निविदेला मान्यता देण्यात आली. मात्र, आयुक्तांनीच नवीन निविदा मंजूरीला ठेवू नये, असे आदेश काढले असताना हा प्रस्ताव ठेवलाच कसा, याबाबत प्रशासनाकडे काहीच उत्तर नाही. “नगरसेवक असताना माझ्या प्रभागात डेकोरेटिव्ह कर्विंग ब्लॉक्स बसविले होते. ते खराब झाल्याने नागरिकांकडून हे ब्लॉक्स पुन्हा बसविण्याची मागणी होती. या पार्श्वभूमीवर मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी निविदा प्रक्रिया राबविली. आज स्थायी समितीमध्ये या निविदेला मान्यता देण्यात आली.” – श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष