PMC News : अतिरिक्त आयुक्तांनीच पकडली चोरी! पावसाळी वाहिन्यांच्या स्वच्छतेची पोलखोल…वाचा सविस्तर
PMC News : कागदावर काम दाखवणाऱ्या उपअभियंत्यांसह क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले; कामात हलगर्जीपणा आढळल्यास थेट निलंबनाचा इशारा.

PMC News – पावसाळावर तोंडावर आलेला असतानाही शहरातील पावसाळी चेंबर, तसेच नालेसफाईची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यातच या कामांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या अतिरिक्त आयुक्तांनीच केवळ कागदावर झालेल्या कामांची पोलखोल केली आहे. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी कसबा आणि विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक महापालिका आयुक्तांसह उपअभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त नायर यांनी परिमंडळ उपायुक्त, तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपण शहरात नियमित तपासणी करणार असून, असे प्रकार उघडकीस आल्यास संबधितांवर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
असा उघडकीस आला प्रकार
महापालिकेकडून यावर्षी नाले सफाई, पावसाळी वाहिन्यांची सफाई, तसेच चेंबर सफाईचे काम क्षेत्रीय कार्यालयांकडे देण्यात आले आहे. त्यांच्याकडून ते वर्षभर केले जाणे अपेक्षित आहे. त्याअंतर्गत झालेल्या कामांची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त नायर यांनी कसबा आणि विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कामाची तपासणी केली.
या वेळी त्यांनी काही पावसाळी चेंबर उघडून दाखविण्याच्या सूचना केल्या. त्या वेळी या चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात झाडांचा पाला, कचरा, तसेच गाळ आढळून आला. त्यावर उपअभियंता, तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. त्यामुळे नायर यांनी थेट तिमय्या जगले आणि प्रदीप आव्हाड या दोन्ही सहायक महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हलगर्जीपणा नको; तातडीने कामे करा
या प्रकारानंतर अतिरिक्त आयुक्त नायर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पावसाळापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. आतापर्यंत सरासरी ७७ टक्के काम झाले असून, उर्वरीत ३३ टक्के काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश नायर यांनी दिले. पुढील आठवड्यापासून नाले व कल्व्हर्ट कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“प्रत्यक्ष काम झालेल्या ठिकाणी पाहणी केल्यावर काम झाले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांना, तसेच अभियंत्यालाही कारण दाखवा नोटीस देण्यात आली आहे.”
– प्रजीत नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त





