PMC Health Department: मलेरिया रोखण्यासाठी महापालिकेची मोठी मोहीम; ९५० आशा वर्कर करणार घरोघरी सर्वेक्षण
PMC Health Department: महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मलेरिया प्रतिबंधासाठी व्यापक उपाययोजना; ९५० आशा स्वयंसेविका आणि २० मलेरिया वर्कर प्रत्यक्ष पाहणी करणार.

PMC Health Department – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मलेरियाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरात मलेरिया प्रतिबंधासाठी ९५० आशा स्वयंसेविका आणि २० मलेरिया वर्कर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. तापाची लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. रॅपिड फिवर टेस्टच्या माध्यमातून मलेरियाचे संशयित रुग्ण स्पष्ट होत आहेत. मात्र, रुग्णाबाबत अधिकृत माहिती मिळविण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आणि महापालिका दवाखान्यातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आशा वर्कर आणि मलेरिया वर्कर घरभेटीद्वारे तापग्रस्त रुग्णांची माहिती संकलित करतील. रुग्णांचे रक्तनमुने ७२ तासांच्या आत कसबा येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. तपासणी अहवालात मलेरिया पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू केले जातील. याशिवाय महापालिका, खासगी दवाखान्यांमध्ये येणाऱ्या तापाच्या रुग्णांवरही विशेष लक्ष ठेवणार असून, संशयित रुग्णांची २४ तासांच्या आत रक्त तपासणी करून त्यांना मलेरिया झाला आहे की नाही, याची खात्री केली जाणार आहे.
शहरातील एखाद्या भागात मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्यास त्या परिसरात डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. औषध फवारणी, कीटकनाशक फवारणी आणि पाण्याचे साठे तपासण्याची कारवाईही केली जाणार आहे. सध्या शहरातील कोणत्याही भागात मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळलेले नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र, पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा असल्याने नागरिकांनी ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
५०० आशा वर्करना प्रशिक्षण
मलेरिया प्रतिबंधासाठी ९५० पैकी सध्या ५०० आशा वर्करना प्रशिक्षित करण्यात आले आहेत. त्यांना पूर्ण आरोग्य किटचे वाटप करण्यात आले असून, उर्वरीत आशा वर्कर यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
“सध्या प्रशिक्षित आशा वर्कर आणि मलेरिया वर्कर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. तापाचे रुग्ण आढळल्यास रक्ताचा नमुना पाठवून मलेरियाची तपासणी केली जात असून, संशयित रुग्ण आढळल्यास पुढील उपचार केले जात आहेत.”
– राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका






