PMC Fine 10 Lakhs – रात्रीच्या अंधारात थेट नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा शोध घेत महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी पहाटे हा प्रकार घडल्यानंतर दुपारी ही बाब समोर आली. महापालिकेने हा राडारोडा कोणी टाकला, याचा शोध पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही तपासणी करून घेतला. त्यानंतर गुरुवारी दुपारी आकांक्षा डेव्हलपर्सवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार या व्यावसायिकाचे बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले असून, ती जागा महापालिकेने सील केली आहे. या बांधकाम व्यावसायिकावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यास १० लाख रुपयांचा दंड आकारला आहे. यापुढे असे प्रकार घडल्यास कोणालाही सोडणार नाही, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. असा लावला छडा.. महापालिकेसमोरच नदीपात्रात राडारोडा टाकल्याने प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची तयारीही बुधवारी रात्री केली होती. पहाटे दोनपर्यंत प्रशासनाने हा राडारोडा कुठून आला, कोणी आणला, याचा शोध घेतला. त्यानंतर आज (ता. १२) सकाळपासून पुन्हा तपास सुरू केला. त्यात हा शिवाजीनगर तोफखाना भागातून राडारोडा आल्याचे समोर आले. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले. तोफखाना येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून आकांक्षा डेव्हलपर्सला बांधकामासाठी परवानगी दिली असून, या विकसकाने नदीत राडारोडा टाकल्याचे समोर आले. त्यानुसार महापालिकेने बांधकाम व्यावसायिक निहाल शेख यांना नोटीस बजावून काम बंद करण्याचे आदेश दिल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. “आम्ही पुण्याची नदी स्वच्छ, सुंदर करण्यासाठी प्रयत्न करत असताना काही जण बेजबाबदारपणे वागत आहेत. अशा नागरिकांवर आम्ही कडक कारवाई करणार आहोत. राडारोडा टाकण्यासाठी प्रशासनाने निर्माण केलेल्या ठिकाणावर राडारोडा टाकला पाहिजे. असे प्रकार रोखण्यासाठी नवीन कार्यपद्धती तयार करणार आहे.” – नवल किशोर राम, महापालिका आयुक्त “हे प्रकार वारंवार घडत आहेत, तरीही प्रशासनाकडून केवळ नावापुरती कारवाई केली जाते. महापालिकेच्याजवळ राडारोडा टाकण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणारे बांधकाम निरीक्षक, कनिष्ठ अभियंता यांसह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.” – मंजुषा नागपुरे, महापौर