PMC Care – महापालिकेत विविध विभागांतील कामांच्या तक्रारी घेऊन आलेल्या किंवा ऑनलाइन तक्रार केलेल्या नागरिकांसाठी असलेली पीएमसी केअर यंत्रणा अधिक सक्षम करणार असून, केलेल्या तक्रारींवर कार्यवाही झाल्यावरच ती तक्रार बंद (क्लोज) केली जाईल, अशी ग्वाही महापौर मंजुषा नागपुरे यांनी गुरुवारी दिली. नागपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. तत्पूर्वी महापौरांनी महापालिकेतील सर्व विभागांची बैठक घेऊन कामाची माहिती घेतली. महापालिकेतील विविध विभागांतील कामांविषयीच्या तक्रारी नागरिक जसे पीएमसी केअरवर ऑनलाइन करतात तसेच अनेक नागरिक माझ्याकडेही तक्रारी घेऊन येतात. त्या जमा करून त्यावर योग्य ते शेरे देऊन संबंधित विभागाकडे पाठवले जात होते. मात्र, त्या तक्रारींचे निवारण झाले किंवा नाही याची माहिती मिळत नव्हती. याशिवाय अनेक तक्रारी या निवारण न करताच संबंधित विभागाकडून संपुष्टात आणल्या जात होत्या, असे नागपुरे म्हणाल्या. मात्र, आता ऑनलाइनशिवाय माझ्याकडे आलेल्या तक्रारीही पीएमसी केअरवर पाठवल्या जाणार आहेत. संबंधित विभागाकडून त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे, तसेच त्याच्यावर काय कार्यवाही केली हे पाहूनच ती तक्रार बंद केली जाणार असल्याचे नागपुरे म्हणाल्या. जे विभाग नागरिकांच्या तक्रारींचे निवारण योग्य प्रकारे आणि समाधानकारक करतील त्यांना बक्षीसे दिली जाणार असल्याचे नागपुरे यांनी सांगितले. याशिवाय आपल्या तक्रारींचे स्टेटस मोबाइलवरही पाहता येणार आहे, तसे बदलही माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला करण्यास सांगितल्याचे नागपुरे म्हणाल्या. महापालिकेची पाच रुग्णालये अद्ययावत करणार महापालिकेच्या स्वत:च्या पाच तयार इमारती शोधून तेथे मल्टिस्पेशालिटी दर्जाची अद्ययावत रुग्णालये उभारण्याचा मानस असल्याचे महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा अभाव आहे. ७५ टक्के मनुष्यबळ सक्षम नाही. मात्र, या रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उपचार केले जातील. त्याचा प्रकल्प अहवाल तयार करायला सांगितले आहे. त्यासाठी लागणारा निधी केंद्रातून आणि राज्यातील आरोग्याच्या फंडातून मागण्यात येईल, असे नागपुरे यांनी नमूद केले.