PMC Budget 2026 – स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकात महसूलवाढीसाठी ज्या उपाययोजना सुचवल्या आहेत त्यात कोणताच नवीन फंडा नसल्याचे दिसत आहेत. स्वतंत्र समिती करणे, करसंकलनावर भर, विशेष कक्ष स्थापन करणार, अशा आजपर्यंत केवळ चर्चिलेल्याच उपाययोजना मंगळवारी अंदाजपत्रकात सूचवल्या आहेत. शहराचा वेगाने होणारा विकास, त्याचबरोबर प्रकल्पांवर होणारा अब्जावधी रुपयांचा खर्च या सगळ्यांची परतफेड होण्यासाठी महसूलवाढीवर महापालिकेला लक्ष केंद्रित करावेच लागणार आहे. हे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. यावर महापालिकेच्या मुख्य सभेत हजारोवेळा चर्चाही झाली आहे. मात्र, ही चर्चा केवळ त्यावेळेपुरतीच राहते. तसेच, हा मुद्दा दरवर्षीच अंदाजपत्रकातही टाकला जातो, मात्र त्यावर अंमलबजावणी होत नाही ही बाबदेखील अनेकवर्षे चालत आहे. असे असताना या वर्षीही नवीन उपाययोजनांच्या नावाखाली एकही ठोस आणि पूर्णत्वाला जाणारी उपाययोजना नसल्याचे दिसून येत आहे. स्वतंत्र समिती, विशेष कक्ष आणि करसंकलनावर भर देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले. दर आठवड्याला उत्पन्नवाढीच्या योजनांचा आढावा घेतला जाणार असून, थकीत करवसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचेही भिमाले म्हणाले. सरकारी अनुदान मिळवण्यासाठी आणि सरकारी कार्यालयांकडील थकबाकी वसुलीसाठीही स्वतंत्र कक्ष कार्यरत करणार असल्याचे भिमाले म्हणाले. या आधीही याचप्रकारे पाठपुरावा केला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. अभय योजना, लोक अदालत, विशेष शिबिरे या सगळ्यांचे आयोजन या आधीही करण्यात येत होतेच. शिवाय महापालिकेच्या मोकळ्या जागा भाड्याने देण्याचाही विषय याआधी अनेकदा चर्चिला गेला आहे. त्यातही आहे त्या भाड्याने दिलेल्या जागांची वसुलीही महापालिकेला पूर्णपणे वसूल करता येत नाही. त्यामुळे आणखी कोणता स्वतंत्र आर्थिक आराखडा तयार करणार हा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.