PMC Abhay Yojana – मिळकतकर थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून १५ नोव्हेंबर ते १५ मार्च या कालावधीत राबविण्यात आलेल्या अभय योजनेत महापालिकेस तब्बल ९५४ कोटी ७८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेकडून या योजने अंतर्गत निवासी तसेच व्यावसायिक मिळकतींना मिळकतकराच्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या व्याजावर ७५ टक्के सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा लाभ १ लाख ६४ हजार ६६५ मिळकतधारकांनी घेतला आहे. त्यामुळे, महापालिकेच्या तिजोरीत थकबाकीची पहिल्यांदाच विक्रमी वसुली झाली आहे. महापालिकेच्या मिळकतकर विभागाची थकबाकी सुमारे १३ हजार कोटी असून, ती वसूल न झाल्याने त्यावर दरवर्षी चक्रवाढ व्याजानुसार २४ टक्के दंड आकारला जातो. त्यामुळे हा डोंगर वाढतच आहे. तर अभय योजनेसह, नियमित वसुलीतून महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत २८०० कोटींचे उत्पन्न जमा झाले आहे. त्यात, २०२५-२६ या आर्थिक वर्षातील सुमारे १८५० कोटी रुपयांच्या वसुलीचाही समावेश आहे. पुणे महापालिका मालमत्ता कर. अपेक्षित उत्पन्नापासून दूरच महापालिका प्रशासनाकडून या पूर्वी पाच वेळा अभय योजना राबविण्यात आली आहे. मात्र, या योजनांमध्ये केवळ निवासी मिळकती तसेच ५० लाखांच्या आत मिळकतकर असलेल्या करधारकांनाच सवलत देण्यात आली होती. मात्र, यावेळी अभय योजनेत कोणतीही अट ठेवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे, प्रशासनाला सुमारे ४ लाख ९७ हजार मिळकतधारकांकडून जवळपास ५ हजार ५०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ १ लाख ६४ हजार ६६५ मिळकतधारकांनीच या योजनेचा लाभ घेतला असून महापालिकेने निश्चित केलेल्या आकड्यापेक्षा अवघी २१ ते २२ टक्केच थकबाकी वसूल झाली आहे. तर, हे उत्पन्न मिळविण्यासाठी प्रशासनासनाने मागील चार महिन्यांत दोन वेळा या योजनेस मुदतवाढ दिलेली आहे. आता कडक कारवाई महापालिका प्रशासनाकडून थकबाकी भरण्यासाठी कर सवलत देऊनही अनेक मिळकतधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मार्च ही कर भरण्याची अंतिम तारीख असल्याने नियमित वसुलीसह थकबाकीदारांच्या मिळकती सील करण्याची कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.