PM मोदींची पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा ! ‘या’ मुद्द्यावर झाली बातचीत

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशिनाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील अलीकडील उच्चस्तरीय विचारविनिमयाचा पाठपुरावा करताना द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्यांसंदर्भातील प्रगतीचा आढावा घेतला.
त्यांनी द्विपक्षीय संबंधांमधील घडामोडींचे सकारात्मक मूल्यांकन केले आणि आणि भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारित धोरणात्मक सहकार्य आणखी दृढ करण्याच्या अनुषंगाने, भविष्यातील उपक्रमांसाठी एक विकसित आराखडा विकसित करण्यास सहमती दर्शवली. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही विचारविनिमय केला.
यावर्षी रशियाच्या अध्यक्षतेखाली होणार् या ब्रिक्स परिषदेला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आणि भारताच्या पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले.गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशियाला भेट दिली होती. त्यावेळी दोन्ही देशांदरम्यानचे लष्करी आणि तांत्रिक सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली होती.
त्या अनुषंगाने पुढील सहकार्याचा आराखडा निश्चित करण्याबाबत पुतीन यांच्याशी चर्चा झाली. तसेच अनेक प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील मुद्यांवरही चर्चा झाली, असे पंतप्रधानांनी आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.





