Priyanka Gandhi : “पंतप्रधान मोदींनी आधीच मणिपूरला जायला हवे होते”; प्रियांका गांधींची खोचक टीका

वायनाड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच मणिपूरला जायला हवे होते. त्यांनी दोन वर्षांनंतर तिथे जाण्याचा निर्णय घेतल्याचा आनंद वाटतो, असे उपरोधिक भाष्य कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केले. मणिपूरने हिंसाचारामुळे प्रदीर्घ काळ अशांत स्थिती अनुभवली. त्या राज्यात मे २०२३ मध्ये वांशिक संघर्षातून हिंसाचार सुरू झाला. त्यानंतर मोदींनी प्रथमच मणिपूरचा दौरा केला. त्यावरून कॉंग्रेसच्या विविध नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या.
केरळमधील आपल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या भेटीवर असणाऱ्या प्रियंकाही पत्रकारांशी बोलताना मोदींच्या दौऱ्यावर व्यक्त झाल्या. मणिपूरमध्ये प्रदीर्घ काळ जे काही घडले ते मोदींनी घडू दिल्याची बाब अतिशय दुर्दैवी आहे. त्या राज्यात अनेक जण मृत्युमुखी पडले. अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले.
भारताचे पंतप्रधान व्यथा, वेदना असणाऱ्या ठिकाणी जातात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी ती परंपरा पाळली गेली. त्या परंपरेचे पालन मोदी दोन वर्षांनी करत आहेत. त्यांनी याआधीच तसा विचार करायला हवा होता असे वाटते, असे त्या म्हणाल्या.
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींना राजधर्माची आठवण करून दिली. मोदींचा ३ तासांचा मणिपूर दौरा केवळ दिखावा आहे. तो दौरा तेथील जनतेचा घोर अपमान आहे. मणिपूरमधील ८६४ दिवसांच्या हिंसाचारात सुमारे ३०० जण मृत्युमुखी पडले, तर १ हजार ५०० हून अधिक जखमी झाले. हिंसाचारामुळे ६७ हजार नागरिक विस्थापित झाले. त्या कालावधीत मोदींनी ४६ परदेश दौरे केले.
मात्र, आपल्याच नागरिकांविषयी सहानुभूतीचे दोन शब्द व्यक्त करण्यासाठी मणिपूरला एकदाही भेट दिली नाही. मोदींनी मणिपूरला याआधी जानेवारी २०२२ मधील निवडणुकीवेळी भेट दिली. त्यांच्या डबल इंजिनने मणिपूरमधील निष्पाप जीव चिरडले, असा जोरदार शाब्दिक हल्लाबोल खर्गे यांनी सोशल मीडियावरून केला.





