PM Modi In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी (१२ नोव्हेंबर) आगमन होणार असल्याने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचेही अधिकारी शहरात दाखल झाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. पुणे पोलिसांसह या दौऱ्याची मुख्य जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे असणार आहे. लोहगाव विमानतळ ते सभास्थळापर्यंत मार्गाची पाहणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
कार्यक्रम स्थळ, लगतचा परिसर, तसेच सभेच्या ठिकाणची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी वाहतूक विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना सतर्कचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक बंदोबस्तास राहणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त, २३ सहायक पोलीस आयुक्त, १३५ पोलीस निरीक्षक, ५७० पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.





