Iran Israel War : मोदी-ट्रम्प यांच्यात ३० मिनिटे चर्चा! ‘होर्मुझ सामुद्रधुनी’ खुली ठेवण्यावर भर
Iran Israel War : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पश्चिम आशियातील युद्धावर दूरध्वनीवरून चर्चा झाली.

Iran Israel War : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी एकमेकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांच्यात पश्चिम आशियातील स्थितीवर चर्चा झाली. त्या चर्चेचा फोकस प्रामुख्याने होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक जहाज वाहतुकीसाठी खुली ठेवण्याच्या गरजेवर होता.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे गॅस, तेल वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ती सामुद्रधुनी पूर्ण खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी याआधी इराणला ४८ तासांची मुदत दिली होती. त्यांनी सोमवारी ती मुदत आणखी ५ दिवसांनी वाढवली.
त्या घडामोडीच्या पुढच्याच दिवशी ट्रम्प यांनी मोदींना फोन कॉल केला. त्याविषयीची माहिती स्वत: मोदींनी सोशल मीडियावरून दिली. आमच्यात पश्चिम आशियातील स्थितीवर उपयुक्त चर्चा झाली. भारत लवकरात लवकर तणाव निवळून शांतता प्रस्थापित होण्याचे समर्थन करतो.
होर्मुझ सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि प्रवासयोग्य असणे संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे. शांतता आणि स्थैर्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांच्या संदर्भात संपर्कात राहण्याविषयी आमच्यात सहमती झाली, असे त्यांनी नमूद केले.




