– आरिफ शेख ट्रम्प यांनी गेल्या पाच दिवसांत वेगवेगळी पाच परस्परविरोधी विधाने करून त्यांच्या मनात किती गोंधळ आहे हे दाखवून दिले आहे. इराण युद्धाच्या दलदलीत ट्रम्प पूर्ण माखले गेले असून, त्यातून बाहेर पडताना त्यांचीच कोंडी झाली आहे. इस्रायलच्या नादी लागून अमेरिकेने इराणवर हल्ले केले; परंतु युद्ध सुरू होऊन आता महिना होत आला, तरी इराण शरण जायला तयार नाही. महत्त्वाचे नेत्यांना ठार केले, म्हणजे इराण दाती तृण धरून शरण येईल, ही अपेक्षा लोप पावली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आज एक गुंतागुंतीचे आणि धोकादायक समीकरण उभे ठाकले आहे. इराणसोबतचा वाढता संघर्ष केवळ लष्करी प्रश्न राहिलेला नाही, तर तो आर्थिक, सामरिक आणि राजकीय स्तरांवर अमेरिकेला वेढून टाकणारा ‘दलदल’ बनला आहे. या दलदलीतून बाहेर पडणे ट्रम्प यांच्यासाठी सोपे नाही आणि त्यांनी उचललेले प्रत्येक पाऊल पुढील परिस्थिती अधिकच क्लिष्ट करू शकते. प्रथम, ट्रम्प यांच्यासमोर उपलब्ध पर्यायांचा विचार केला तर ते अत्यंत मर्यादित आहेत. एक पर्याय म्हणजे संघर्ष अधिक तीव्र करणे, इराणच्या महत्त्वाच्या तेल केंद्रांवर हल्ले करणे किंवा होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी लष्करी कारवाई तीव्र करणे; परंतु यापैकी कोणताही मार्ग निवडल्यास इराणकडून प्रतिउत्तर म्हणून ड्रोन, क्षेपणास्त्र, सायबर हल्ले किंवा प्रॉक्सी गटांच्या माध्यमातून प्रादेशिक अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ मध्यपूर्वच नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे मर्यादित लष्करी कारवाई करतानाच कूटनीतिक मार्ग खुले ठेवणे. ओमानसारख्या मध्यस्थांच्या साहाय्याने गुप्त वाटाघाटी सुरू करणे, निर्बंधांमध्ये काही शिथिलता देण्याचा विचार करणे आणि इराणला सुरक्षिततेची हमी देण्याचा प्रयत्न करणे, हा तुलनेने कमी जोखमीचा मार्ग ठरू शकतो. तथापि, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी मांडलेल्या अटी, अणुकार्यक्रमावरील अधिकारांची मान्यता, युद्धभरपाई आणि भविष्यातील हल्ल्यांविरुद्ध हमी या अमेरिकेसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत कठीण आहेत. तिसरा आणि कदाचित सर्वात व्यवहार्य पर्याय म्हणजे ‘रणनीतिक माघार’. म्हणजेच, युद्धातील उद्दिष्टं साध्य झाल्याची घोषणा करून संघर्षातून सन्मानजनक बाहेर पडणे. हा मार्ग निवडल्यास अमेरिकेच्या प्रतिमेला काही प्रमाणात धक्का बसू शकतो; परंतु दीर्घकालीन दृष्टीने तो अधिक नुकसान टाळू शकतो. इतिहासावर नजर टाकल्यास दीर्घकाळ चाललेली युद्धं बहुतेक वेळा अपेक्षित परिणाम देत नाहीत. ट्रम्प यांच्यासारख्या एकाधिकारशाही मानणार्या व्यक्तीला माघार मान्य आहे का, हा खराच प्रश्नच आहे. ट्रम्प यांनी गेल्या चार दिवसांत युद्ध थांबवण्याची केलेली भाषा, चर्चेचा मार्ग खुला असल्याचे केलेले वक्वव्य आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग मोकळा केला नाही, तर बाँबहल्ले करण्याची दिलेली धमकी आणि पाच हजार सैनिक, लढाऊ विमाने आणि युद्धनौका इराणच्या दिशेने पाठवण्याचा घेतलेला निर्णय तसेच सध्याचे सरकार उलथवून कळसूत्री सरकार स्थापन करण्याचा पवित्रा पाहता इराण हा युद्धबंदी करण्यास तयार होण्याची सूतराम शक्यता नाही. युद्धात इराणचे नुकसान झाले असले, तरी अमेरिकेचीही कमी हानी झालेली नाही. ट्रम्प यांच्यापुढील आव्हाने तितकीच गंभीर आहेत. एकीकडे इराणकडून होणारा थेट व अप्रत्यक्ष लष्करी धोका आहे, तर दुसरीकडे जागतिक तेलबाजारातील अस्थिरता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकते. वाढती महागाई, ऊर्जा किमतींतील चढउतार आणि पुरवठा साखळीतील अडथळे यामुळे अमेरिकन नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ट्रम्प यांची लोकप्रियता झपाट्याने कमी होत आहे, हे स्पष्ट झाले आहे. इस्रायलसारख्या मित्रदेशांचा दबाव आणि आखातातील व्यापक राजकीय समीकरणेही ट्रम्प यांना सतत संतुलन ठेवण्यास भाग पाडत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील येत्या संसदीय निवडणुका ट्रम्प यांच्यासाठी मोठे राजकीय आव्हान ठरू शकतात. अमेरिकन मतदार परराष्ट्र धोरणातील अपयशाला गंभीरतेने घेतात. जर युद्ध दीर्घकाळ चालले, आर्थिक परिस्थिती ढासळली किंवा अमेरिकन सैनिकांचे मोठे नुकसान झाले, तर त्याचा थेट परिणाम मतदानावर होऊ शकतो. विरोधी पक्ष ट्रम्प यांच्या धोरणांवर ‘अविचारी आणि धोकादायक’ असा आरोप करत जनमत आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करेल. विशेषतः मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गातील मतदार हे इंधनदरवाढ आणि महागाईमुळे आधीच त्रस्त आहेत. ते ट्रम्प यांच्या विरोधात जाऊ शकतात. याशिवाय, युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि जागतिक पातळीवरील अमेरिकेच्या प्रतिमेची घसरण ही देखील निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते. परिणामी, काँग्रेसमध्ये ट्रम्प समर्थकांची संख्या कमी होण्याचा धोका नाकारता येत नाही. इराणसोबतचा संघर्ष ट्रम्प यांच्यासाठी केवळ परराष्ट्र धोरणाचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो त्यांच्या राजकीय भविष्याचा निर्णायक घटक ठरत आहे. या परिस्थितीत संतुलित, संयमी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्वच त्यांना या दलदलीतून बाहेर काढू शकते. अन्यथा, हा संघर्ष केवळ आखातापुरता मर्यादित न राहता अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणालाही हादरा देऊ शकतो. ट्रम्प इराणवरील बॉम्बहल्ले थांबवू शकतात; परंतु इराण हा होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाच्या वाहतुकीला अडथळा आणणे सुरूच ठेवू शकतो. परिणामी तेलाच्या किमती सातत्याने वाढतील, तर खते, औषधे, हेलियम आणि होर्मुझवर अवलंबून असलेल्या इतर वस्तू दुर्मिळ होतील. यामुळे अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येईल. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी ठामपणे म्हटले आहे, की या युद्धाचा शेवट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अमेरिकेने तीन मोठ्या अटी मान्य करणे. इराणच्या वैध अधिकारांना (बहुधा युरेनियम संवर्धनाच्या अधिकारांना) मान्यता देणे, युद्धभरपाई देणे आणि इराणविरुद्ध भविष्यात हल्ले न करण्याची आंतरराष्ट्रीय हमी देणे, या तीन अटी असून या अटींवर चर्चा होण्याची शक्यता अत्यंत कमी वाटते, तरीही इराणी अधिकारी ठाम आहेत, की त्यांना भविष्यात हल्ला होणार नाही याची खात्री मिळेपर्यंत युद्ध सुरूच राहील. ट्रम्प हे तणाव वाढवून या कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील. ते इराणच्या तेल उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या खर्ग बेटावर कब्जा करण्याचा प्रयत्न करू शकतात. दुसरा पर्याय असा असू शकतो, की होर्मुझ सामुद्रधुनीतला मार्ग खुला ठेवण्यासाठी इराणच्या नियंत्रणाखालील काही बेटांवर कब्जा करणे; परंतु इराणी भूभाग ताब्यात घेतल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न उरतोच. जर इराणने शरणागती पत्करली नाही, तर अमेरिकन मरीन सैनिक महिनोन् महिने इराणी भूमीवर तैनात राहतील का? या काळात इराण हा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने जहाजमालकांना घाबरवू शकतो किंवा समुद्रात टाकलेल्या स्फोटकांद्वारे होर्मुझमधील तेलवाहतूक रोखू शकतो. तो येमेनमधील हौती गटाला तांबड्या समुद्रातील वाहतूक रोखण्यास प्रवृत्त करू शकतो. त्यामुळे तेल निर्यात आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अधिकच बाधित होईल. तसेच तो या प्रदेशातील इतर तेलसंबंधित पायाभूत सुविधांवर हल्ले करू शकतो. सायबर हल्ले किंवा दहशतवादी कारवायांचाही धोका नाकारता येत नाही. ट्रम्प हे इस्फहानमध्ये सैन्य पाठविण्याचा विचार करत आहेत. तेथे साठवलेले उच्च संवर्धित युरेनियम ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो; परंतु हा अत्यंत धोकादायक निर्णय ठरेल, कारण तेथे खरोखर युरेनियम आहे की नाही, हेही निश्चित नाही. पुढे काय होईल, याचा ठाम अंदाज कोणीही बांधू शकत नाही. कदाचित इराणची ड्रोन व क्षेपणास्त्र क्षमता संपेल किंवा अमेरिका यशस्वी होईल, किंवा एखाद्या दिवशी इराणमधील काही मवाळ लष्करी अधिकारी सत्तांतर घडवून आणतील आणि अमेरिकेसोबत करार करतील. काहीही घडू शकते; मात्र सध्या असे दिसते, की ट्रम्प यांनी स्वतःलाच एका कठीण परिस्थितीत लोटले आहे.