Commonwealth Games 2030 : कॉमनवेल्थ गेम्सच्या बोलीला मंत्रिमंडळाची मंजुरी, ‘या’ शहराला यजमानपदाची मान्यता

Commonwealth Games 2030 Hosting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2030 च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी बोली लावण्याच्या युवा क्रीडा मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना (IOA) पुढील 48 तासांत बोली प्रक्रिया पूर्ण करणार आहे. बोली सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असून, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ग्लासगो येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सच्या सर्वसाधारण सभेत यजमान देशाचा निर्णय घेतला जाईल. कॅनडाने आर्थिक कारणांमुळे माघार घेतल्याने भारताच्या यजमानपदाच्या शक्यता वाढल्या आहेत.
अहमदाबाद शहराची यजमानपदासाठी दावेदारी –
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या पीआयबी (PIB) निवेदनानुसार, भारतातर्फे गुजरातमधील अहमदाबाद शहराची यजमानपदासाठी दावेदारी सादर केली जाईल. अहमदाबाद हे जागतिक दर्जाचे स्टेडियम आणि अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधांनी युक्त आदर्श यजमान शहर आहे. येथील नरेंद्र मोदी स्टेडियम, जगातील सर्वात मोठे स्टेडियम, यात 2023 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये 72 देशांचे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होतील. या आयोजनामुळे पर्यटनाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि क्रीडा क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रांतही संधी उपलब्ध होतील.
The #UnionGovt Cabinet, under the leadership of Honourable PM Shri @narendramodi ji, has approved the signing of Host Collaboration Agreement and Grant-in-Aid Sanction for Gujarat Government, as their submission of bid for 2030 #commonwealthgames. pic.twitter.com/Rh9BC2tpNm
— Anmol Maheshwari (@AnmolGovernance) August 27, 2025
रोजगार आणि प्रेरणेची मिळणार संधी –
कॉमनवेल्थ गेम्सच्या यजमानपदामुळे केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर पर्यटन, रोजगार आणि युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. या आयोजनामुळे क्रीडा विज्ञान, आयोजन व्यवस्थापन, रसद आणि वाहतूक समन्वय, प्रसारण आणि माध्यम, माहिती तंत्रज्ञान, जनसंपर्क आणि संनाद यासारख्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांना संधी मिळतील. अशा भव्य क्रीडा आयोजनामुळे राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना वृद्धिंगत होईल. देशाच्या सर्व भागांतील लोकांचा सहभाग या आयोजनात असेल, ज्यामुळे राष्ट्रीय मनोबल उंचावेल. याशिवाय, नव्या पिढीतील खेळाडूंना क्रीडा हा करिअरचा पर्याय म्हणून स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि सर्व स्तरांवर क्रीडा सहभाग वाढेल.
यापूर्वीही भारताने भूषवले आहे यजमानपद –
यापूर्वी 2010 मध्ये भारताने नवी दिल्ली येथे कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद भूषवले होते, जिथे भारताने आपला सर्वोत्तम प्रदर्शन केले होते. 2026 मध्ये स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन होणार आहे, तर 2022 मध्ये इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे हा क्रीडा महासंघ आयोजित झाला होता.
अहमदाबाद हे आधुनिक क्रीडा केंद्र –
अहमदाबाद हे आधुनिक क्रीडा सुविधांनी युक्त शहर असून, येथील नरेंद्र मोदी स्टेडियमने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. या आयोजनामुळे गुजरातसह संपूर्ण देशाला आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळतील, तसेच भारताच्या क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेला बळ मिळेल.





