चार दिवसांसाठी पंतप्रधान मोदी ब्राझीलमध्ये दाखल; ब्रिक्स परिषदेला राहणार उपस्थित

रिओ डी जनेरिओ (ब्राझील) – पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अधिकृत सरकारी भेटीसाठी ब्राझीलमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधानांच्या पाच देशांच्या दौऱ्याचा हा चौथा टप्पा असून या भेटीदरम्यान ते ब्रिक्स गटाच्या १७ व्या परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत. शनिवारी संध्याकाळी गॅलेओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर पंतप्रधान मोदींचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.
रिओ दि जानेरो येथे त्यांचे मनापासून स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील भारतीय समुदायाचे कौतुक केले. संगीत आणि सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून स्थानिक कलाकारांनी त्यांचे स्वागत केले.
मध्ये ऑपरेशन सिंदूरला समर्पित कलाविष्कार देखील सादर केला गेला. स्थानिक नागरिक भारतीय संस्कृतीशी किती घट्ट जोडलेले आहेत आणि भारताच्या प्रगतीबाबत किती उत्कटतेने कार्यरत आहेत, हे स्वागत पाहून आश्चर्य वाटते, असे पंतप्रधानांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ब्राझीलमध्ये आज आणि उद्या (दि. ६ आणि ७ जुलै) होत असलेल्या ब्रिक्स परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. या परिषदेनंतर पंतप्रधान ब्राझीलमधील वरिष्ठ नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्समध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या पाच अतिरिक्त सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ब्रिक्सचा संस्थापक सदस्य म्हणून भारत उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये सहकार्यासाठी एक महत्त्वाचा व्यासपीठ म्हणून या गटाला मान्यता देण्यास वचनबद्ध आहे, असे ब्राझीलला रवाना होण्यापुर्वीच्या निवेदनात पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या परिषदेदरम्यान ते जागतिक शांतता आणि सुरक्षा, प्रशासन सुधारणा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर, हवामान कृती, जागतिक आरोग्य, आर्थिक बाबी यासह इतर महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करणार आहेत. या परिषदेला उपस्थित असलेल्या देशांच्या नेत्यांशी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशीही पंतप्रधानांची द्विपक्षीय बैठक होणार आहे.





