Pune Gramin : आळेफाटा परिसरात प्रवाशांच्या जीवाशी खेळ

आळेफाटा : कल्याण नगर महामार्गाची अक्षरशा पावसामुळे चाळण झाली आहे. आळेफाटा बस स्थानक ते आळे गाव दरम्यान रस्त्याला मोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे या परिसरात अनेक अपघात देखील झाले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी या कामाकडे कानाडोळा करत आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या परिसरात निर्माण झाली आहे.
आळेफाटा व आळे परिसरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था असल्याने रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. कांदा व डाळिंब या पिकांसोबतच गुरे देखील मोठ्या प्रमाणात येथील उपबाजार समितीत शेतकरी वर्गाकडून विक्रीसाठी आणली जातात, या परिसरात वैद्यकीय सेवेचे मोठे जाळे असल्याने रुग्ण व नातेवाईकांची, रुग्णवाहिकेची सतत ये जा या रस्त्याने होत असते.
आळेफाटा मोठी बाजारपेठ असल्याकारणाने खरेदीसाठी ग्राहकांची येथे सतत वर्दळ असते. या सर्वांनाच या परिसरातून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे रहदारीची देखील मोठी कोंडी या परिसरात सतत होत असते. अधिकारी मात्र या संपूर्ण प्रश्नाकडे कानाडोळा करत असून सामान्य जनतेच्या जीविताशी त्यांना काही घेणे देणे नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे.
आळे ग्रामपंचायती कडून वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. परंतु त्याला सुद्धा अधिकारी दाद देताना दिसून येत नाहीत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या प्रश्नात लक्ष घालून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे.




