Satara News : कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक ठप्पच; मोठ्या वाहनांना बंदी

कोयनानगर : पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा कराड-चिपळूण राज्य महामार्ग पुन्हा एकदा पावसाळी तडाख्यात अडकला आहे. वाजेगाव येथे भराव खचून वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर सोमवारी रात्रभरच्या मुसळधार पावसामुळे शिरळ-मारूल दरम्यानचा वळण रस्ताही पाण्यात गेला. परिणामी गेल्या 24 तासांपासून या महत्त्वाच्या महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग दरवर्षी पावसात गारद होतो.यंदाही हाच इतिहास पुन्हा घडला आहे. परिस्थितीचा अंदाज घेत प्रशासनाने मोठ्या अवजड वाहनांना मार्गावरून जाण्यास बंदी घातली आहे. तर लहान वाहनांना मर्यादित स्वरूपात प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, वळण रस्ताच पाण्याखाली गेला असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही कायम आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. ओलेकर, मंडलाधिकारी संजय जंगम हे घटनास्थळी दाखल झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी कामाला गती दिली आहे. नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेता प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केले असून हा मार्ग बुधवारी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या परिस्थितीबद्दल प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी सांगितलं की, ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने मार्ग अद्याप पूर्णतः सज्ज नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आम्ही स्वतः या ठिकाणी लक्ष ठेवून काम मार्गी लावत आहोत. दरवर्षी पावसाळा सुरू होताच या महामार्गावर अपयशाची मालिका सुरू होते. भराव खचणे, तात्पुरते वळणमार्ग वाहून जाणे, वाहतूक ठप्प होणे हे प्रकार आता
नेहमीचे झाले आहेत. मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्यामुळे प्रवाशांचा त्रास वाढतोय आणि प्रशासन फक्त घटना घडल्यानंतर हालचाली करते, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटते आहे.





