परभणी : पावसाळ्यात चिखलमय रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत असताना, परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी गावातील ग्रामस्थांनी आपल्या संतापाला अनोख्या आंदोलनातून वाट मोकळी करून दिली. अवघ्या दीड किलोमीटरच्याखराब रस्त्यामुळे गावकऱ्यांना दरवर्षी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यंदा मात्र, सहनशीलतेचा अंत पाहता, गावकऱ्यांनी चिखलमय रस्त्यात अर्धनग्न होऊन डबक्यात लोटांगण घालत प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात तीव्र निषेध नोंदवला. पावसाळ्यातील रस्त्यांचा त्रास, गावकऱ्यांचा संताप राज्यभरात पावसाचा जोर वाढत असताना, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. टाकळवाडी गावातील हा दीड किलोमीटरचा रस्ता वर्षानुवर्षे खराब आहे. पावसाळ्यात चिखलाचा दलदल बनलेला हा रस्ता वाहनांसाठी तर नाहीच, पण पायी चालणाऱ्यांसाठीही जणू कसोटी ठरतो. यामुळे दैनंदिन प्रवास, शेतीची कामे आणि आपत्कालीन परिस्थितीत गावकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. चिखलात लोटांगण, प्रशासनाला इशारा वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी अखेर थेट रस्त्यावर उतरत आपला निषेध व्यक्त केला. चिखलमय रस्त्यात अर्धनग्न होऊन डबक्यात लोटांगण घेत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल बोलताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. “आम्हाला रस्ता नाही, आमच्या मुलांना शाळेत जायला त्रास होतो, आजारी माणसांना दवाखान्यात नेणे अशक्य आहे,” असे त्यांनी भावनिक होत सांगितले. या अनोख्या आंदोलनाने गावकऱ्यांनी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली असून, यापुढे कोणतेही दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. या आंदोलनाला स्थानिक पातळीवर मोठी प्रसिद्धी मिळाली असून, प्रशासन याची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करेल, अशी आशा गावकऱ्यांना आहे.