Nevasa News : रस्ते दुरुस्तीचा ‘रस्ता’ही खड्ड्यात; नेवासा बांधकाम विभागाच्या दारातच चिखलाचे साम्राज्य

नेवासा : नेवासा तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आता इतकी बिकट झाली आहे की, प्रवाशांना “रस्ते की खड्डे, बांधकाम विभाग ओके!” असा उपहास करावा लागत आहे. मात्र, या विभागाच्या नेवासा फाटा येथील कार्यालयाकडे जाणारा रस्ताच चिखल आणि खड्ड्यांच्या जाळ्यात सापडला असेल, तर तालुक्यातील इतर रस्त्यांची काय अवस्था? असा संतापजनक सवाल आता जनतेतून उघडपणे व्यक्त होत आहे.
शुक्रवार (१९ सप्टेंबर) दुपारी दोन वाजता ‘प्रतिनिधी’ने नेवासा फाटा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची पाहणी केली. मुख्य प्रवेशद्वारापासून कार्यालयापर्यंतचा साधा रस्ता दुरुस्त करता येत नसेल, तर विभागाच्या जबाबदारीतील इतर रस्त्यांची दशा काय असेल? हा प्रश्न जनतेतून उपस्थित होत असून, विभागाच्या ‘स्वतःच्या दारी’ची दुर्दशा पाहून लोकांचा राग आणि हास्य दोन्ही मिसळीने वाढत आहे.
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रवास करताना आता प्रत्येक प्रवाशाची ‘मनके’ ढिली होत आहेत. चालक आणि प्रवाशांना या खड्ड्यांच्या त्रासाची पूर्ण कल्पना असून, दैनंदिन छोटे-मोठे अपघात वाढले आहेत. नेवासा-शेवगांव राज्यमार्गाचीही प्रचंड दुरवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असताना, कार्यालयाकडे जाण्यासाठीच योग्य रस्ता नसेल तर ‘दाद’ कोणाकडे मागायची? असा सवाल सर्वसामान्यांमध्ये चर्चिला जात आहे.





