Plastic flowers – सणा-सुदीला, विविध उत्सवात सजावटीसाठी बाजारात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच प्रदुषणही मोठया प्रमाणात वाढत आहे. यामुळे कृत्रिम फुले बंद व्हावीत व फुल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी निवेदनाद्वारे केली. या मागणीला 105 आमदारांच्या सहीसह पाठिंबा पत्र जोडले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे मंत्री गोगवले यांनी देखील शासन कृत्रिम फुलांवर बंदी आणेल, असे म्हटले आहे. रोहित पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सर्रासपणे प्लॅस्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीतील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून सदरची फुले बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांमुळे अत्यल्प दरात विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्लॅस्टिक पिशवी वापरावर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली त्याप्रमाणे या प्लॅस्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा होणार आहे. द्राक्षपिक व इतर फळपिकांना पर्यायी व्यापारी पिक म्हणून फुलशेती केली जाते. या फुलशेतीसाठी लागणारी औषधे, मजुरी व ट्रान्सपोर्ट खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लॅस्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध आणून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. कृत्रिम फुलांवर बंदी आणणार शासन कृत्रिम फुलांवर बंदी आणेल, आम्ही सीएमसोबत मिटींग असून त्यात हे ठरले आहे. कृत्रिम फुलांमुळे शेतकरी वर्गाला फटका बसतो पण त्याचवेळी रासायनिक कलर वापरणेही यामुळे थांबेल, असे भरत गोगावले यांनी सांगितले आहे. आमदार महेश शिंदे यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थित करत हा मुद्दा चर्चेला आणला होता. त्यावर, हा निर्णय घेण्यात आला आहे.