Satara | निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या योजना सत्ता देणार नाहीत

वाई, (प्रतिनिधी) – छ. शिवाजी महाराजांनी इतिहासातील गडकिल्ले उभे करून साडेतीन वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही अभेद्यपणे उभे आहेत, परंतु सध्या राज्यात असणार्या भ्रष्ठ महायुती सरकारने उभा केलेला छत्रपतींचा पुतळा साडेतीन वर्षेसुध्दा टिकला नाही. सिंधुदुर्ग उभारणीसाठी महाराजांनी सुरत लुटली.
परंतु, महायुतीमधील गुलाबी जॅकेटवाले सत्तेसाठी लाचारी पत्करत आहेत. गेल्या अडीच वर्षात महायुतीची सत्ता आहे.
मात्र, तेव्हा बहीण लाडकी नव्हती, टोलमाफी करायला वेळ नव्हता. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांची दिशाभूल करणार्या योजना जाहीर करून निवडणुका जिंकता येत नाहीत, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.
यावेळी वाई मतदार संघातील उमेदवाराची चिंता करू नका, शरद पवार साहेबच हेच या मतदार संघातील उमेदवार आहे असे समजून तुतारीला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवस्वराज्य यात्रेचे वाईत जल्लोषी स्वागत झाले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, प्रदेश युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख, महिला प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी महांगडे, प्रदेश विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनील गव्हाणे,
युवती प्रदेशाध्यक्षा सुलक्षणा सलगर, प्रदेश विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉ. नितीन सावंत, अॅड. निलेश डेरे, प्रसाद सुर्वे, यशराज भोसले, अॅड. विजयसिंह पिसाळ, दिलीप बाबर, रमेश धायगुडे, अनिल जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवार यांची गोची झाली असून भाजपा जेवढ्या जागा निवडणुकीसाठी देणार त्यावरच त्यांना समाधान मानावे लागणार आहे. गुलाबी जॅकेट घालून निवडणुका समोर ठेवून लाडकी बहीण सारख्या योजना जाहीर करता.
परंतु, अजित पवारांना बहिणी विषयी बोलण्याचा अधिकारच नाही. ज्यांनी लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या बहिणीला बदनाम केले.
भाजपचे रणनीती ही मित्रपक्षांना संपविण्याची असून त्याची प्रचिती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आल्या शिवाय राहणार नाही. सर्व जाती धर्माला बरोबर घेवून छ. शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला होता. त्याची पुनरावृत्ती करण्याची ही एक नामी संधी आलेली आहे.
जयंत पाटील म्हणाले, राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल माहिती पडल्यानेच राज्याच्या तिजोरीची दारे उघडी केली आहेत. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
परंतु त्या टिकणार्या नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महिला संरक्षण योजना अतिशय खंबीरपणे राबविण्यात येथील. राज्यात कायदा सुव्यस्था नाही. लोकप्रतिनिधींची सुध्दा गोळ्या झाडून हत्या होते. महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी आत्महत्या करत आहे.
अत्याचार केलेल्या मुलींची तक्रार सुध्दा पोलीस लवकर घेत नाहीत. महाराष्ट्रातील सुज्ञ जनता याला भुलणार नसून येणार्या निवडणुकीत राज्यात सत्ता बदल निश्चितच होणार आहे. फक्त मतदारांनी तुतारीला साथ द्यावी.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, वाई विधानसभा मतदार संघातून मला निवडणूक लढविण्यासाठी आग्रह करण्यात होत असला तरीही जिल्ह्याच्या राजकारणाला लागलेली राजकीय कीड कोरेगाव तालुक्यातून हद्द पार करण्यासाठी मी कोरेगावमधूनच विधानसभा निवडणूक लढणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा पुन्हा युवकांची ताकद उभी करून नव्याने पक्षाची उभारणी करणार आहेत. पुरोगामी विचारांवर चालणार्या जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करणार्या जात्यंध शक्तीला हद्दपार करण्याची काम येथील मतदार यावेळी करणार आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत वाई मतदार संघातून मताधिक्य घेवून ट्रेलर दाखविले आहे पिक्चर अभी बाकी आहे.
यावेळी आ. बाळासाहेब पाटील, अभिनेत्री अश्विनी महांगडे, डॉ. नितीन सावंत, अॅड. निलेश डेरे, अॅड. विजयसिंह पिसाळ, रमेश धायगुडे, दिलीप बाबर, अनिल जगताप, सुनील गव्हाणे, मेहबूब शेख यांनी मनोगत व्यक्त केले.प्रसाद सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. केदार गायकवाड यांनी आभार मानले.
परिवर्तन घडणारच : अॅड. निलेश डेरे
सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण, क्रांतिवीर किसन वीर आबा यांचा आदर्श विचारांवर चालणारा आहे. त्यांचा आदर्श पुढे नेण्याचं काम शरदचंद्र पवार करत आहेत.
शरद पवार साहेबांच्या विचारांचे कट्टर कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे नक्कीच वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडणार.
-अॅड. निलेश डेरे





