पुणे जिल्हा : युती सरकारने केवळ ओरबडण्याचे काम केले – खासदार अमोल कोल्हे

उरुळी कांचन येथे अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सभा
उरुळी कांचन – जन्मलेल्या बाळाच्या व्हॅक्सिनपासून तिरडीवर पडलेल्या मृतदेहाच्या कफनाच्या कापडावर देखील जीएसटी आकारुन मोठा विकास केला. एका हाताने देऊन दहा हाताने ओरबडण्याचे काम युती सरकारने केले, असा घणाघात शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते. डॉ. कोल्हे म्हणाले, शिरूरमध्ये अजित पवारांची सभा झाल्याचे काही जणांनी मला सांगितले. काहींनी चष्मा बदलण्याचाही मला सल्ला दिला.
तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन टीका करता, उद्या तुमच्या मतदारसंघात येऊन उत्तर देणार हे मी ठणकावून सांगतो. 2019ला मी तुमच्याकडे तिकीट मागायला आलो होतो की, तुम्ही तिकीट घेऊन आला होतात हे सांगा असे आव्हान कोल्हे यांनी अजित पवारांना दिले आहे.
आम्ही भरलेल्या टॅक्सचा वाटेल तसा उपयोग करून आम्ही विकास केला असा भास निर्माण केला. शहराभोवती तयार करण्यात येणार्या रिंगरोडचा खर्च अचानक 18 हजार कोटींवरून 41 हजार कोटींवर कसा जातो? नेमका हा मलिदा कोणाच्या घशात जाणार आहे याचे अगोदर उत्तर द्या असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला.
आज खरं तर बराच हिशेब चुकता करायचा होता; परंतु नंतर बोलेन. उरुळी करांनी माझ्यावर भरभरून प्रेम केल आपला खासदार म्हणून संसदेत पाठवलेत यात आमदार अशोक पवार यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी बापूंना मत म्हणजे पवार साहेबांना मत हे ध्यानात ठेवा असे बोलून मतदारांना आवाहन केले.
पुणे जिल्ह्यातील नेते व आमदार अजित पवारांबरोबर गेले; मात्र मी पवार साहेबांबरोबर राहिलो. याचा राग माझ्यावर आहे. त्यामुळे ते माझ्यावर बोलत आहेत. जो आपल्या पक्षाचा, नेत्याचा होऊ शकत नाही, ते समाजाचे कधी होत नाही.
-अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली





