पुणे जिल्हा | डांकिने भीमाशंकर की जय ; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

मंचर, (प्रतिनिधी) – क्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रावणी सोमवारी भाविकांनी पहाटेपासून महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केली होती. डांकिने भीमाशंकर की जय व हर हर महादेवच्या जयघोषाने आणि भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजुन गेला होता. सुमारे अडीच लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.
खासदार अमोल कोल्हे यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. मंदिरात रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शिवलिंगावर आकर्षक विविध रंगीबेरंगी फुलांची, तसेच बेलाच्या पानांची सजावट करण्यात आली.
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पवित्र शिवलिंगावर दूग्ध व जलाभिषेकाने पूजा करण्यात आली. यानंतर शंखनाद करत महाआरती करण्यात आली.
त्यानंतर शिवभक्तांसाठी दर्शन रांग पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी सुरू करण्यात आली.भीमाशंकरच्या परिसरात निसर्गसौंदर्य अधिकच खुलून उठले असून, प्रत्येकजण या निसर्गाच्या प्रेमात पडतो आहे.
त्यामुळे पवित्र शिवलिंगाचे दर्शन व पर्यटन अशा दुहेरी हेतूने भीमाशंकरकडे नागरिकांचा ओढा वाढली आहे. शनिवार, रविवारच्या सलग सुट्ट्या व इतर दिवशी भाविकांसह पर्यटकांनी भीमाशंकरला पसंती दिली आहे.
श्रावणच्या चौथ्या सोमवारी लाखो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. भीमाशंकर परिसर हा अभयारण्य असलेला व विपुल जंगल संपदेने नटलेला परिसर पर्यटका मोहुन टाकत आहे.
यात हुतात्मा बाबु गेणु सागर (डिंभे धरण), पोखरीघाट ते भीमाशंकर परिसरात डोंगरटेकड्यांनी हिरवळीने नटलेल्या सह्याद्री पर्वताच्या रांगाच आपल्याला दिसतात. मुक्त उधळण, ठिकठिकाणी छोटे – मोठे धबधबे, बोचरीथंडी, धुके, ऊन-पावसाचा खेळ असा सर्वत्र नजारा आहे.
भीमाशंकरच्या परिसरात निसर्गसौंदर्य अधिकच खुलून उठले असून, प्रत्येकजण या निसर्गाच्या प्रेमात पडतो आहे. त्यामुळे पवित्र शिवलिंगाचे दर्शन व पर्यटन अशा दुहेरी हेतूने भीमाशंकरकडे नागरिकांची गर्दी वाढली आहे.
देवस्थान विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडिलकर, गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, सरपंच दत्तात्रय हिले आदि पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न करत होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
घोडेगाव व खेड पोलीसठाण्याचे एक पोलिस निरिक्षक तीन सहायक पोलीस निरिक्षक, 6 उपनिरिक्षक, 80 पुरुष पोलीस कर्मचारी व 10 महिला पोलीस कर्मचारी असा चोख बंदोबस्त नेमण्यात आला होता.
तर एस.टी महामंडळाचे वाहतूक नियत्रकं मारुती खळदकर हे 8 मिनी बस व 22 मोठ्या बसेस यांचे वाहनतळ 4-5 ते बस स्थानकापर्यंत सेवा देत होते.





