Farmer Crisis | ओल्या दुष्काळाने उध्वस्त झाला शेतकरी…पण खासदार अमोल कोल्हे गायब ; शेतकऱ्यांचा संताप

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – राज्यभरात ‘ओला दुष्काळ’ जाहीर व्हावा इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली, उभे पीक आडवे पडले, उत्पादन घसरले आणि शेतकरी कर्जबाजारी झाला. अशा वेळी मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी गावोगाव फिरणे अपेक्षित होते. परंतु, खासदारांचा मतदारसंघात वावरच दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठा रोष निर्माण झाला आहे.
सत्ताधारी नेते स्थानिक प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. पंचनामे वेळेत होत नाहीत, नुकसानभरपाईचा ठोस निर्णय होत नाही. शेतकरी दररोज आंदोलने करत उभा आहे. सत्ताधाऱ्यांच्या गाड्या केवळ राजकीय कार्यक्रमातच दिसतात. विरोधकांची परिस्थितीही काही वेगळी नाही. सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखवून देण्याऐवजी ते फक्त निवडणुकीत भाषण करून जातात. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आवाज बनण्याचे काम कुणीच करत नाही.
खासदार, सत्ताधारी नेते आणि विरोधक – सगळेच केवळ राजकारणाच्या व्यापात गुरफटले आहेत. मात्र शेतकऱ्याचे आयुष्य दर पावसागणिक उद्ध्वस्त होत चालले आहे. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या सर्वच पक्षांची उदासीनता उघड झाली आहे. पुढच्या निवडणुकीत मतदार याची नोंद ठेवणार, हे नक्की!
आज शेतकरी विचारतो…
१. आमचे निवडून दिलेले खासदार कुठे आहेत?
२. पिकं पाण्यात गेली, पण पंचनामे का झाले नाहीत?
३. नुकसानभरपाईचा निर्णय का होत नाही?





