करोना बाधितांसाठी बेड्सचे नियोजन करा

पालकमंत्री : विधानभवन येथे आढावा बैठक
पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात करोनाबाधित आणि मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. करोनाबाधितांना बेड्स अपुरे पडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
विधानभवन सभागृहात पवार यांच्या अध्यक्षतेखाली “कोविड व्यवस्थापन व नियोजना’बाबत बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकत्र प्रयत्न करावेत. ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. पावसाळ्यातील अन्य संसर्गाचे आजार व सारी आजाराच्या रुग्णांवर वेळेत व योग्य उपचार देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी.
पुरंदर विमानतळाला गती द्या
करोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रखडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पुरंदर विमानतळाचे काम लवकरात लवकर सुरू होऊन गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. पुणे मेट्रोसह जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.





