Piyush Goyal : आराम सोडा व निर्यातीसाठी प्रयत्न करा; वाणिज्य मत्री पियुष गोयल यांचा भारतीय कंपन्यांना सल्ला

मुंबई : भारतात 140 कोटी नागरिकांची विशाल बाजारपेठ आहे. त्यामुळे पुरेसा नफा मिळत असल्यामुळे भारतातील कंपन्यांना आरामात राहायची सवय लागली आहे. या कंपन्यांनी आता अंग झटकून निर्यात पेठेतील संधी शोधून कामाचा विस्तार करण्याची गरज आहे,असा सल्ला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारतातील कंपन्यांना दिला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना गोयल यांनी सांगितले की, केवळ भारतातील बाजारपेठेवर अवलंबून राहिल्यास भारताचा थोडाफार विकास होऊ शकेल. मात्र भारताला विकसित देश व्हायचे असल्यास उद्योगांनी निर्यात करून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची गरज निर्माण झाली आहे. जून अखेरच्या तिमाहीत भारताचा विकास दर तब्बल 7.8% इतका भरला आहे. यावरून भारताची बाजारपेठ किती विशाल आहे, याचा अंदाज येतो. मात्र एवढ्यावरच भारतातील कंपन्यांनी थांबू नये.
गोयल म्हणाले की, स्थानिक बाजारपेठेत मिळत असलेला नफा पुरेसा आहे, त्यामुळे आपल्याला अधिक ताण घेण्याची गरज नाही असे समजून भारतीय कंपन्या आरामात राहण्याच्या मानसिकतेत आहेत. यामुळेच या कंपन्या उत्पादनाचे मूल्यवर्धन करून किंवा उत्पादनाचा दर्जा वाढवून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करीत नाहीत, असे आपल्याला खेदाने नमूद करावे लागते.
ते म्हणाले की, भारत तांदळाची निर्यात करतो. मात्र तांदळापासून तयार होणार्या पदार्थाची निर्यात करण्याची कल्पना भारतीय उद्योगांना का अंमलात आणता येत नाही. भारत आपल्याकडे असलेले दुर्मिळ पोलादाचे खनिज सरळ -सरळ निर्यात करतो मात्र यापासून दर्जेदार पोलाद तयार करून ते का निर्यात केले जात नाही असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो.
अशीच बाब इतर उत्पादनाबाबतही आहे. अनेक देश आपल्याकडून कच्चा माल घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करून विकसित झाले असल्याचे आपल्याला पहावे लागते, असे गोयल यांनी सांगितले. भारतीय उद्योगांनी ही मानसिकता सोडून जागतिक व्यासपीठावर मुलुखगिरी करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.





