पिंपरी – पोर्टमोर्टम झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना तो कापडात व्यवस्थित गुंडाळून द्यावा लागतो. त्यासाठी आवश्यक साहित्य देण्यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) शवविच्छेदन कक्षातील कर्मचारी मृताच्या नातेवाईकांकडून प्रमाणापेक्षा जास्त पैसे उकळत असल्याच्या तक्रारी नातेवाईक करत आहेत. त्यामुळे, नातेवाईकांना आर्थिक फटका बसत आहे. वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षात दररोज सुमारे सहा ते सात शवविच्छेदन होतात. शवविच्छेदनानंतर मृतदेह कापड, प्लॅस्टिकच्या कागदात व्यवस्थित गुंडाळून ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे एखाद्यावेळी रक्तस्त्राव होत असल्यास प्रवासात अथवा अंत्यसंस्कारावेळी त्यामधून रक्त बाहेर येत नाही. मृतदेह कापडात गुंडाळण्यासाठी चार मीटर कापड, चार-पाच मीटर सुतळी, निलगिरीचे तेल, प्लास्टिक बॅग, चादर असे साहित्य आवश्यक असते. बाजारात हे साहित्य खरेदी केल्यास जास्तीत जास्त सहाशे ते सातशे रुपये खर्च येतो. मात्र, वायसीएममधील कर्मचारी दुप्पट, तिप्पट रक्कम म्हणजे जवळपास दीड हजार रुपये उकळत असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेह कपड्यात गुंडाळण्यासाठी आवश्यक साहित्य महापालिकेकडून पुरविले जात नाही. ते नातेवाईकांनीच आणावे, असे तेथील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. मात्र, सर्व साहित्य सहाशे ते सातशे रुपयांत मिळत असताना येथील कर्मचारी नातेवाईकांकडे जादा पैशांची मागणी करतात. जवळचा व्यक्ती गेल्याने नातेवाईक दुःखात असतात, अशा परिस्थितीत बाहेरील दुकानात जाऊन शोधाशोध करून साहित्य आणून देणे शक्य नसते. अशावेळी नातेवाईक नाईलाजास्तव मागेल तितकी रक्कम तेथील कर्मचाऱ्यांच्या हातावर ठेवतात. पोर्टमोर्टमनंतर मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणारे साहित्य रुग्णालयाकडून पुरविले जात नाही. हे साहित्य नातेवाईकांनी आणणे आवश्यक आहे. मात्र, नातेवाईकांना दुकाने माहित नसल्यास अथवा ऐनवेळी हे साहित्य कुठून आणायचे ? याबाबत माहित नसल्यास शवविच्छेदन कक्षातील कर्मचारी नातेवाईकांकडून पैसे घेऊन हे साहित्य आणून देतात. मात्र, या साहित्यासाठी लागणारी योग्य रक्कमच नातेवाईकांकडून घेणे आवश्यक आहे. कोणी अतिरिक्त पैशांची मागणी करत असल्यास रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधावा. – डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय आमच्या नातेवाईकाचे निधन झाल्यानंतर त्यांचे वायसीएममधील शवविच्छेदन कक्षात शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी मृतदेह कापडात गुंडाळून आमच्या ताब्यात देण्यासाठी तेथील कर्मचाऱ्याने कापडास इतर खर्चासाठी दीड हजार रुपयांची मागणी केली. पैसे द्यायचे नसल्यास तुम्ही साहित्य घेऊन या, असे सांगितले. दरम्यान, हे पैसे खूप होतात सांगितल्यानंतर कसेबसे आठशे रुपये घेऊन कर्मचाऱ्याने साहित्य आणले. त्यानंतर, आम्ही मृतदेह ताब्यात घेऊन रवाना झालो. अडचणीच्यावेळी अडवणूक करुन अतिरिक्त पैशांची मागणी केली जात आहे. – मृताचे नातेवाईक.