Pimpri News : रिक्षा संघटनांचा विजय! आरटीओच्या लेखी आश्वासनानंतर संप मागे

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – बेकायदेशीर बाइक टॅक्सी आणि ‘मुक्त परवाना’ धोरणाविरोधात राज्यव्यापी लाक्षणिक बंद शहरात शंभर टक्के यशस्वी झाला. ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (महाराष्ट्र विभाग), महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिक्षा ब्रिगेड आणि ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीने हा बंद पुकारला होता. आरटीओच्या लेखी आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केली.
बंदच्या दिवशी सकाळपासून रिक्षा-टॅक्सी सेवा ठप्प होती. दुपारी पुणे आरटीओ कार्यालयात अधिकारी अर्चना गायकवाड व स्वप्निल भोसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. लेखी आश्वासनानंतर हा बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा डॉ. बाबा कांबळे यांनी केली. रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना, बेकायदेशीर बाइक टॅक्सीवर बंदी, ‘मुक्त परवाना’ धोरण रद्द करणे, ओला-उबर दरांचे नियमन आणि CNG बॉटल टेस्टिंग शुल्क कमी करणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.
बैठकीला शुभम तांदळे, मोहम्मद भाई शेख, विलास केमसे पाटील, कुमार शेट्टी, अविनाश वाडेकर, निशांत भोंडवे, अनिल शिरसाट, विशाल ससाने आदी पदाधिकारी उपस्थित होते. शासनाने दिलेल्या आश्वासनांची त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा यावेळी शिष्टमंडळाने व्यक्त केली.





