Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहरातील ‘बीएच’ (भारत सीरीज) नोंदणी असलेल्या वाहनधारकांसाठी परिवहन विभागाने कडक इशारा दिला आहे. नियोजित मुदतीत वाहन कर न भरल्यास दररोज १०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून, थकबाकीदारांवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित वाहनधारकांनी तातडीने कर भरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. केंद्र सरकारने ऑगस्ट २०२१ पासून ‘बीएच’ (भारत सीरीज) नोंदणी योजना लागू केली. या योजनेमुळे सरकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच चार किंवा अधिक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना देशभर एकाच नोंदणी क्रमांकावर वाहन वापरण्याची सुविधा मिळाली. बदलीनंतर वाहनाची पुन्हा नोंदणी, एनओसी आणि कर परताव्याच्या किचकट प्रक्रियेतून दिलासा मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या एकूण १९,६८३ ‘बीएच’ नोंदणीची वाहने असून, त्यापैकी अनेक वाहनांचा कर प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर थकबाकीदार वाहनधारकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत परिवहन विभागाचे अधिकारी राहुल जाधव म्हणाले, “बीएच वाहनधारकांनी वेळेत कर न भरल्यास प्रतिदिन १०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नियमांचे पालन करून वेळेत कर भरणे आवश्यक आहे.” परिवहन विभागाने वाहनधारकांना ऑनलाईन प्रणालीद्वारे कर भरण्याचे आवाहन केले असून, नियमांचे पालन करून दंड टाळण्याचा सल्ला दिला आहे. असा आकारला जातो कर ‘बीएच’ मालिकेतील वाहनांसाठी कर आकारणी इनव्हॉइस किमतीवर आधारित असून, ती टप्प्याटप्प्याने निश्चित करण्यात आली आहे. १० लाख रुपयांखालील वाहनांवर ८ टक्के, १० ते २० लाख रुपया दरम्यानच्या वाहनांवर १० टक्के, तर २० लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या वाहनांवर १२ टक्के कर आकारला जातो. डिझेल वाहनांसाठी या करात २ टक्के अतिरिक्त भार टाकण्यात येतो, तर इलेक्ट्रिक वाहनांना २ टक्के सवलत दिली जाते. ‘बीएच’ नोंदणी असलेल्या वाहनांसाठी दर दोन वर्षांनी कर भरणे बंधनकारक आहे. हा कर इनव्हॉइस किंमत, त्यावर १.२५ पट गुणाकार आणि दोन वर्षांच्या कालावधीच्या आधारे निश्चित केला जातो. नियोजित मुदतीनंतर सात दिवसांनंतरही कर न भरल्यास दररोज १०० रुपयांप्रमाणे दंड आकारला जातो. त्यामुळे विलंब केल्यास वाहनधारकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. हेही वाचा: Shirpur Merchants Co-operative Bank: RBIची मोठी कारवाई! शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द; 6 एप्रिलपासून सेवा बंद