Pimpri News | पिंपरी-चिंचवडचा पर्यावरण अहवाल धक्कादायक; पाणी , हवा , ध्वनी प्रदूषणात उच्चांकी..

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी नदीतील पाण्याची तपासणी केली असता पाण्यामध्ये हानिकारक घटक असल्याचे उघड झाले आहे. शहरातील पवना नदी ही सर्वाधिक तर त्याखालोखाल इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. तसेच शहरातील हवेची गुणवत्ता देखील ढासळली असून शहरामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकापेक्षा धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. तसेच ध्वनी प्रदूषणातही वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव महापालिकेच्या पर्यावरण आहवालातून समोर आले आहे. नदी स्वच्छता तसेच इतर बाबींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही महापालिका प्रशासनाला प्रदूषण कमी करण्यास अपयश आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरण क्षेत्रातील स्थितीचा मागोवा घेणारा २०२४-२५ चा पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल मंगळवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते (दि. ५) प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात क्षेत्र आणि लोकसंख्या, हवामानातील बदल, पर्जन्यमान, पाणीपुरवठा, नदी-नाले-तलावांची सद्यस्थिती, जलनिःरसारण योजना व मैलाशुद्धीकरण प्रकल्प, हवेतील व ध्वनी प्रदूषणाचे स्तर, मृदा गुणवत्ता, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा वापर, रस्ते आणि चाहतूक व्यवस्था, स्मार्ट सिटी प्रकल्प, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्याने, उद्योगधंदे, आपत्ती व्यवस्थापन, शहर नूतनीकरण योजना आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
या अहवालातून हवा, पाणी याबाबतची माहिती मांडण्यात आली आहे. शहरातील तीन नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जाते. पवना नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत असल्याने नदी पात्रामध्ये कचरा, प्लास्टिक टाकले जात आहे. तसेच अनेक ठिकाणी सांडपाणी थेट नदीत सोडले आहे. तर इंद्रायणी नदी औद्यगिक भागातून वाहते. अनेक कंपन्यांनी घातक रसायनांचे नाले थेट नदीत सोडले आहेत. त्याचा परिणाम पाण्यावर होत असून सातत्याने नदीचे पाणी फेसाळते. नद्यांचे प्रदूषण कमी करण्यामध्ये पर्यावरण विभागाला सातत्याने अपयश येत आहे.
दुसरीकडे शहरातील हवेची गुणवत्ता देखील ढासळली आहे. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या पुढे गेला असून तो नोव्हेंबर २०२४ मध्ये तो १८९ नोंदवला गेला आहे. अशा हवामानामध्ये वृद्ध, मुले तसेच गंभीर आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतो. शहराच्या हवेमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या विहित मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषके असल्याचे आढळून आले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीरण व वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शहरातील हवेचे प्रदूषण होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
वीज, बायोगॅस निर्मिती..
मोशीतील कचरा डेपोत आतापर्यंत तीन लाख ५१ हजार ५४२ मेट्रीक टन घरगुती कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. त्यापासून १३ कोटी ७९ लाख ४० हजार ८५९ युनिट्सवी वीज निर्मिती झाली. बांधकाम राडारोडा व्यवस्थापन प्रकल्पामधील ३९ हजार ८२७ टन कचन्यावर प्रक्रिया करण्यात आली. हॉटेल वेस्ट टू बायोगॅस या प्रकल्पामध्ये तीन हजार ५९३ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून यामधून एक लाख १२ हजार २४९ किलो बायोगॅसची निर्मिती केली.
ध्वनी प्रदूषणात वाढ..
शहरातील तळवडे, भोसरी एमआयडीसी या औद्योगिक पट्यासह पिंपरी कॅम्प, पिंपळे सौदागर परिसरातील मॉल, बाजारपेठ, भाजी मंडई, मेट्रो परिसरात ध्वनी प्रदूषणात वाढ इमली आहे. ध्वनी प्रदूषण पातळी विहित डेसिबलपेक्षा अधिक आहे.
काही महत्वाचे निष्कर्ष..
१) उद्यान व पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून विविध संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, नागरिक इत्यादींच्या सहभागाने विविध ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य नियमितपणे तसेच विविध अभियानांच्या माध्यमातून केले जाते. सन २०२४-२५ मध्ये पालिकेच्या माध्यमातून एकूण १ लाख ७३ हजार ५७६ वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
२) शहराचे हवामान साधारणपणे उष्ण कटीबंधाप्रमाणे आहे. सन २०२४-२५ मध्ये शहरामध्ये भोसरी येथे सर्वात जास्त जुलै महिन्यात २१८.० मिमी इतका तर चिंचवडमध्ये १९७.५ मिमी इतका पाऊस नोंदवला गेला आहे.
३) सन २०२४-२५ मध्ये गतवर्षीच्या तुलनेत नोंदणीकृत वाहनांच्या संख्येत ३६ टक्के वाढ झालेली दिसून येत आहे. शहरात नोंदणी होणाऱ्या एकूण वाहनांपैकी ३.५ टक्के ई-वाहनांचे प्रमाण दिसून येत आहे. सन २०२४-२५ पर्यंत साधारणपणे ५०,९०२ ई-वाहनांची नोंद झालेली आहे.





