Pimpri News | प्रभाग रचना तयार करताना नैसर्गिक हद्दीचे नियम डावलले ; राष्ट्रवादी काॅंग्रेसचा आक्षेप

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – प्रभाग रचना तयार करताना नैसर्गिक हद्दीचे नियम डावल्यात आले आहेत. त्यामुळे चुकीच्या प्रभाग रचनेबाबत जास्तीत जास्त हरकती नोंदविल्या जाणार आहेत, असा आक्षेप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे. दैनिक प्रभातच्या बाप्पांच्या आरतीसाठी योगेश बहल आपल्या सहकाऱ्यांसह पिंपरी-चिंचवड कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी दैनिक प्रभात आणि डिजिटल प्रभात दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्दयांवर भाष्य केले.
ते म्हणाले की, चिंचवड शहरातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाव्यात व शहराचा आणखी विकासात्मक कायापालट व्हावा यासाठी आगामी कालावधीत प्राधान्य देण्यात येणार आहे. नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, वाहतुक कोंडीची वाढती समस्या दूर व्हावी, उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सक्रियपणे काम सुरु ठेवले जाणार आहे.
महापालिका निवडणुक ही महायुती की स्वबळावर निवडणुका लढवायच्या याबाबत अजित पवार जो निर्णय देतील त्याचे पालन केले जाईल. निवडणूक लढविण्याबाबतची रणनिती आखण्याची तयारी सुरु आहे. उमेदवारांची निवड, चाचपणी केली जात आहे. मतदार याद्यांचाही बारकाईने अभ्यासही सुरु आहे.
अजित पवार यांनी सन १९९२ पासून पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात लक्ष घातले असून तेच या शहराच्या विकासाचे खरे शिल्पकारआहेत. केंद्र व राज्य शासनाचा जास्तीत जास्त निधी शहराच्या विकासाठी आणण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. शरद पवार यांनीही निधीसाठी सतत प्रयत्न केले, असेही बहल यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आराखडा चुकीच्या पध्दतीने तयार करण्यात आला आहे. त्यात अनेक त्रुटी आहेत. मंजूर आरक्षणावर पुन्हा नवीन आरक्षणे टाकण्यात आली आहेत. रेडझोन, एमआयडीसीच्या जागांसह अन्य काही विकास प्रकल्पाच्या जागांवर नवीन आरक्षणे टाकण्यात आली आहेत. काही ठिकाणी इमारत बांधकामासाठी परवानगी दिलेली असताना त्या ठिकाणी पुन्हा काही आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे विकास आराखडा रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही बहल यांनी नमूद केले आहे.
राज्यात महायुती शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य योजना राबविल्या जात आहे. वीज, दळणवळणाचे प्रश्न सुटत आहे. शेतकरी वर्गाचे व बेरोजगारीचाही समस्या दूर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादामुळे महायुती शासनातील तीनही पिलर चागंले काम करत अाहेत, असेही बहल म्हणाले.





