Government Job Scam – समाजकल्याण विभागात वरिष्ठ निरीक्षक आणि जेल पोलीस पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाने तीन जणांची ४३ लाख ८१ हजार ९८५ रुपयांची फसवणूक केली आहे. अजमेरा, पिंपरी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी जितेंद्र गणपत रसाळ (वय ३८, रा. योगी को. ऑ. सोसायटी, अजमेरा, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. ३) याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूरज मदन पाटील (रा. मु. पो. काटी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना सप्टेंबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अजमेरा, पिंपरी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज पाटील याने फिर्यादी जितेंद्र रसाळ यांची भेट घेऊन त्यांना समाजकल्याण विभागात वरिष्ठ निरीक्षक पदावर नोकरी लावतो, असे सांगितले. तसेच रसाळ यांचा पुतण्या सत्यम रसाळ आणि विक्की रेणुसे यांना नागपूर जेल पोलिसमध्ये भरती करून देतो, असे आमिष दाखवले. या बदल्यात त्याने वेळोवेळी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून एकूण ४३ लाख ८१ हजार ९८५ रुपये उकळले. मात्र, कोणालाही नोकरी न लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे रसाळ यांच्या लक्षात आले. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेटे तपास करत आहेत.