Pimpri News | धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ; आम आदमी पक्षाचा बिग प्लॅन

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – शहरामध्ये अनेक बलाढ्य पक्ष आहेत. मात्र, आम आदमी पार्टी (आप) हा पक्ष सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधीत्व करणारा आहे. त्यामुळे ही महापालिका निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे असे म्हणत आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपावर टीका केली.
दैनिक प्रभातच्या पिंपरी चिंचवड कार्यालयामध्ये गणेशोत्सवानिमित्त आयोजित आरती सोहळ्यासाठी काळे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीसाठीची तयारी यावर भाष्य केले. काळे म्हणाले, शहरामध्ये संघटना बांधणीचे काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी परिषदेत काम करत होतो.
दोन वर्षांपूर्वी आपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर युवक अध्यक्षपदाची जबाबदारी वरिष्ठांनी दिली. त्यानंतर आता शहराध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. विविध पक्ष शहरात आहेत. मोठी आव्हाने आहेत. मात्र आम्ही मोठ्या तयारीने या निवडणुकीला सामोरे जात आहे. आपच्या पाठिशी सर्वसामान्य जनता आहे.
जनशक्तीच्या जोरावरच आम्ही पालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहे. बलाढ्य पक्ष समोर आहे, मात्र, आम्ही जनशक्तीच्या जोरावर त्यांना सामोरे जात ही महापालिका निवडणूक जिंकणार आहे.महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार की युती, आघाडीसोबत असे विचारले असता, ते म्हणाले, आपचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या आदेशाने आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहोत.
त्यानुसार १२८ जागा लढविण्यासाठी आम्ही जोरदार तयारी केली आहे. परंतु, महाविकास आघाडीसोबत आम्ही लोकसभा आणि विधानसभेला होतो. जर त्यांच्याकडून तसा काही प्रस्ताव आला तर आम्ही वरिष्ठांना कळवू. मात्र आम्ही स्वबळावर लढत महापौर आपचा बसवण्याची तयारी केली आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहेत. तसतसेच अनेकांचे प्रवेश होत आहेत. आम्ही १२५ जणांची यादी तयार केली आहे. त्यानुसार शहरात काम सुरू आहे.
कुदळवाडीची कारवाई कोणासाठी?
मी विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होते. मात्र, त्यामध्ये अनेक बंधने होती. मला येथील कामगार, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी काहीतरी काम करायचे होते त्यासाठी राजकीय व्यासपीठ निवडले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाण्याची समस्या आहे. यामध्ये राजकीय, प्रशासकीय सगळेच अपयशी ठरले.
मोठ्या प्रमाणार महापालिका कर्जबाजारी केली जात आहे. कुदळवाडीचे अतिक्रमण कोणाच्या फायद्यासाठी काढले गेले? असे प्रश्न सोडविण्यासाठी व्यासपीठ आवश्यक आहे. ते आपने उपल्बध करून दिले आहे.





