Pimpri News | खोपोलीत निवडणूक घोटाळा? ; एका प्रभागात १४० डुप्लिकेट मतदार
प्रभात वृत्तसेवा
खालापूर – देशभरात निवडणूक आयोगावर गैरव्यवहारांचे आरोप होत असताना रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खोपोली शहरातील शिळफाटा परिसरातील प्रभाग क्रमांक १० मधील मतदार याद्यांचे परीक्षण करताना तब्बल १४० मतदारांची नावे दोन वेळा नोंदवलेली आढळली आहेत.
तसेच अनेक स्थलांतरित आणि मृत झालेल्या नागरिकांची नावंही अद्याप यादीत कायम असल्याचा आक्षेप आम आदमी पार्टीने केला आहे.विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इंडिया आघाडीने देशभरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप नुकताच केला होता. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी खोपोली तर्फे स्थानिक मतदार याद्यांची तपासणी करण्यात आली. त्यातच हा गंभीर प्रकार उघडकीस आला.
पक्षाचे प्रदेश संघटन सचिव डॉ. रियाज खान पठाण यांनी शिळफाटा प्रभाग क्रमांक १० मधील एकूण पाच मतदार याद्यांचा अभ्यास केला. त्यात सुमारे ४,५०० ते ५,००० मतदारांपैकी १४० मतदारांची नावे दोन वेळा नोंदवलेली असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय स्थलांतरित झालेले अनेक नागरिक आणि गेल्या काही वर्षांत निधन झालेल्या नागरिकांची नावेही अद्याप यादीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आम आदमी पार्टीची निवडणूक आयोगाकडे तक्रार..
या सर्व घोळांबाबत आम आदमी पार्टीने खालापूर तहसीलदार तसेच निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले की,या चुका केवळ खोपोलीपुरत्या मर्यादित नाहीत. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अशा त्रुटी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने सर्व मतदार याद्यांचे पुनर्परीक्षण करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मृत आणि स्थलांतरितांची नावे अजूनही यादीत..
खोपोलीतील मतदार याद्यांमध्ये स्थलांतरित झालेले नागरिक, कायमचे दुसरीकडे गेलेले रहिवासी तसेच मृत झालेल्या व्यक्तींची नावे अजूनही न वगळल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या त्रुटीमुळे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पारदर्शक निवडणुकीसाठी दुरुस्तीची मागणी..
खोपोलीतील प्रकरण हा केवळ एक नमुना असून, निवडणूक आयोगाने तातडीने सर्व मतदार याद्यांचे काटेकोर पुनर्परीक्षण करणे आवश्यक असल्याचे आम आदमी पार्टीने ठामपणे सांगितले आहे. अन्यथा लोकशाहीच्या पायावर आघात होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.





