प्रभात वृत्तसेवा पिंपरी – उद्योगनगरी असलेले पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण भाग मेट्राेने जाेडण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ने यापूर्वी केलेल्या आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा तयार करण्यात येणार आहे. नवीन आराखड्यात काही गावांचा, स्टेशन वाढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या महिन्याभरात आराखडा तयार हाेण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पिंपरी ते स्वारगेट अशी मेट्रो धावत आहे. या मार्गाचे निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत ४.५१९ अंतर विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या एकमेव मेट्रो मार्गानंतर दुसऱ्या टप्प्यात निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा दुसर्या मार्गाचा आराखडा तयार केला. या आराखड्यामध्ये एकूण ३१ मेट्रो स्टेशन आणि हा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) असणार हाेता. यामध्ये पिंपरी – चिंचवड शहरात सर्वाधिक २५ स्टेशन तर, चाकण नगरपालिका हद्दीत सहा मेट्रो स्टेशन हाेती. निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या प्रकल्पासाठी एकूण १० हजार ३८३ कोटी ८९ लाख खर्च अपेक्षित धरण्यात आला हाेता. ६० टक्के निधी कर्जातून उभारणार महामेट्राेने निगडी ते चाकण मार्गाच्या जुन्या आराखड्यात लाेकप्रतिनिधींच्या सुचनांची दखल घेऊन सुधारित आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. सुधारित आराखड्यात मार्ग वाढला किंवा स्टेशनची संख्या वाढल्यास खर्चातही वाढ हाेण्याची शक्यता आहे. मेट्राेसाठी केंद्र शासनाचा १० टक्के आणि राज्य शासनाचा १० टक्के हिस्सा असणार आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा खर्चाचा हिस्सा १५ ते २० टक्के असणार आहे. उर्वरित ६० टक्के निधी कर्जातून उभारला जाण्याची शक्यता आहे. असा आहे मार्ग दरम्यान, जुन्या आराखड्यात निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक, ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर (वायसीएमजवळ), गवळीमाता चौक, भोमरी एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण असा हा मार्ग हाेता. आता सुधारित आराखड्यात काही गावांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. “महामेट्राेने निगडी ते चाकण मेट्राे मार्गाचा आराखडा तयार करून महापालिकेला दिला हाेता. या आराखड्याचे पालकमंत्र्यांसह शहरातील लाेकप्रतिनिधींना सादरीकरण झाले. त्यांनी काही सुचना केल्या हाेत्या. त्यानुसार सुधारित आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. नवीन गावे किंवा स्टेशनचा समावेश केल्यास खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.” – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्राे.