प्रभात वृत्तसेवा पिंपरी – ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी तब्बल दोन कोटी १० लाख ४ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना ९ जुलै ते ९ सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन पद्धतीने घडली आहे.याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात बँक खातेधारक व ग्रुप ॲडमीन (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी “India Stock Circle” या टेलिग्राम ग्रुपमार्फत फिर्यादीचा संपर्क साधून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला नफा दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर कर, फी व चार्जेसच्या नावाखाली विविध वेळा दोन कोटी १० लाख रुपये हस्तांतरित करून फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण नाळे अधिक तपास करीत आहेत.