प्रभात वृत्तसेवा पिंपरी – ‘फर्निस अँड फाऊंडी इक्विपमेंट प्रा. लि.’ (फॅफेको) कंपनीमध्ये स्टोअर असिस्टंट पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने विश्वासाचा गैरफायदा घेत २२ लाखांहून अधिक किमतीच्या साहित्य अपहार केला. ही घटना फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२५ या कालावधीत खेड तालुक्यातील वसुली येथे घडली.बाजीराव शिवाजी टाळके (वय ३९, रा. सानेगुरुजी शाळेजवळ, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकाश विश्वनाय तौर (वय ४४, रा. संगीता रेसिडेन्सी, जांबे, पुनावळे) यांनी गुरुवारी (दि. २) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने स्टोअर असिस्टंट म्हणून काम करताना मटेरियलची बनावट नोंद करून, सिक्युरिटी गार्डकडून चुकीच्या एंट्री करून घेतल्या. यामध्ये नोव्हेंबर २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत २२ लाख ३६ हजार २३८ रुपयांचे स्पेअर पार्ट्स गायब केले. कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना दबावाखाली चुकीच्या नोंदी करायला लावल्या. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक करीत आहेत.