Pimpri Crime: अमेरिकेत पैसे पाठवण्याच्या बहाण्याने १५.७५ लाखांची फसवणूक

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – मुलाला शिक्षणासाठी अमेरिकेत तातडीने पैसे पाठवण्याच्या बहाण्याने एका इसमाने एका व्यक्तीचा विश्वास संपादन करून आरटीजीएसद्वारे १५ लाख ७५ हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतले आणि व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी चिखली प्राधिकरण येथे घडली.
याप्रकरणी अमित आण्णासाहेब रोहमारे (५५, चिखली प्राधिकरण) यांनी गुरुवारी (दि. ११) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिपु देसाई (अंधेरी, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहमारे यांचा मुलगा अमेरिका येथे शिक्षण घेत आहे.
त्याला शैक्षणिक फी भरण्यासाठी तात्काळ १७ हजार ५०० डॉलर (भारतीय चलनात १५ लाख ७५ हजार रुपये) आवश्यक होते. याबाबत रोहमारे यांनी आरोपीला विचारणा केली. आरोपीने “माझे ओळखीचे लोक तीन तासात तुमच्या मुलापर्यंत पैसे पाठवतील, काळजी करू नका” असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्याच्यावर विश्वास ठेऊन रोहमारे यांनी आरोपीला पैसे पाठवले. मात्र ते पैसे रोहमारे यांच्या मुलाला न देता आरोपीने त्याचा अपहार करून रोहमारे यांची फसवणूक केली.





