Pimpri Chinchwad News: “ही आवास योजना की भास योजना?” पिंपरी महापालिकेवर कष्टकऱ्यांचा घर हक्क मोर्चा
Pimpri Chinchwad News: किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना तात्काळ घरांचा ताबा द्या आणि मुद्रांक शुल्क माफ करा; कष्टकरी संघर्ष महासंघाची महापालिकेकडे मागणी.

Pimpri Chinchwad News – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १० हजार घरांची निर्मिती करावी, किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना तात्काळ घरांचा ताबा द्यावा, मुद्रांक शुल्क माफ करावे तसेच प्रलंबित प्रश्न सोडवावेत, या मागण्यांसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथे घर हक्क मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने लाभार्थी, कामगार आणि नागरिक सहभागी झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने सन २०२० मध्ये रावेत येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांसाठी अर्ज मागविले होते. त्यावेळी अनेक कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिक पात्र ठरले. त्यावेळी घराची किंमत ६ लाख ९५ हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र, महानगरपालिकेच्या अक्षम्य नियोजन शून्यतेमुळे संबंधित जागेचा ताबा घेणे आणि बांधकाम करणे शक्य झाले नाही.
त्यानंतर लाभार्थ्यांना किवळे येथील गृहप्रकल्पात घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या प्रकल्पातील घरांची किंमत वाढून १३ लाख रुपये करण्यात आली. आर्थिक अडचणी असूनही स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी ही वाढीव किंमत स्वीकारली. काशिनाथ नखाते यांनी सांगितले की, किवळे गृहप्रकल्पाची सोडत १५ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली.
मात्र, सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळालेला नाही. उलट अनेक लाभार्थी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बँकेचे कर्जाचे हप्ते भरत आहेत. घराचा ताबा नसताना आर्थिक ओझे वाढत असून त्यांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार वेगवेगळ्या कागदपत्रांची, मंजुरीची आणि प्रशासकीय प्रक्रियेची कारणे पुढे करून ताबा देण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप करत ही ‘आवास योजना आहे… की भास योजना ?’
अशी टीकाही त्यांनी केली. नखाते पुढे म्हणाले की, महापालिकेच्या निष्काळजीपणा आणि भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांचे घराचे स्वप्न रखडले आहे. यावेळी चेतन गायकवाड, राजेश माने, कान्हाभाऊ व्हरकटे, अमृत पाटील, सखाराम केदार, शुभांगी चव्हाण, आशा जाधव, भागवत नागपुरे, अंगद मुंगळे, प्रीती गोहाड, विकी भाट, जितेंद्र महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.
पालिकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा महापालिकेपर्यंत काढण्यात आला. शिष्टमंडळाला चर्चेसाठी न बोलावल्याने आंदोलकांनी महापालिका कार्यालयात प्रवेश करून प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व अण्णा बोदडे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. मुद्रांक शुल्क माफीची प्रक्रिया सकारात्मक असून, उद्या आयुक्त सूर्यवंशी यांच्यासोबत बैठक घेऊन ताबा व शुल्कमाफीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन जंगम यांनी दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.






