Pimpri Chinchwad News: आम्ही खरंच ‘स्मार्ट सिटी’त राहतो का? पिंपळे गुरवमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; नागरिक संतप्त
Pimpri Chinchwad News: कचऱ्याच्या कुबट वासामुळे स्थानिकांना श्वसनाचा त्रास; महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी.

– संगिता पाचंगे
Pimpri Chinchwad News – आम्ही खरंच स्मार्ट सिटीत राहत आहोत का? पुढील पन्नास वर्षांचे नियोजन हेच का ते? आणि महापालिकेचा आरोग्य विभाग नक्की करतोय तरी काय? असे संतप्त सवाल आता शहरातील नागरिक करत आहेत . त्त्यातच आता पिंपळे गुरवमधील गजानन नगर परिसरातील कांकरिया गॅस गोडाऊन समोर गेल्या चार दिवसांपासून कचऱ्याचा मोठा ढिगारा साचून रस्त्यावर पसरत असल्याचे चित्र दिसत आहे.
मात्र महापालिका प्रशासन याकडे पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. पिंपळे गुरवमधील मोरया पार्क लेन क्रमांक ३ आणि ४ समोरील रस्त्याच्या कडेला गेल्या चार दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. कचरा न उचलल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परीसराल आरोग्य विभाग कचरा उचलण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे.
त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवसभरात हलक्या पावसाच्या सरी पडत असल्याने, या पावसामुळे रस्त्यावरील कचरा कुजण्यास सुरुवात झाली असून, हवेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या कुबट वासामुळे स्थानिक नागरिकांना आणि ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च केला असून, पुढील ५० वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधा विकसित केल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो. मात्र, एवढ्या मोठ्या सुविधा उभारूनही दैनंदिन कचरा व्यवस्थापनासारखी मूलभूत बाब सुरळीतपणे राबवता येत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आरोग्य विभागाकडे तक्रार केल्यानंतर प्रशासन त्वरित कचरा उचलते आणि स्वच्छता करते. मात्र, त्यानंतर काही तासांतच पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. कचरा टाकण्यावर आणि तो नियमित उचलण्यावर प्रशासनाचा कोणताही कायमस्वरूपी अंकुश नाही.
यावेळी नागरिकांकडून स्वच्छता बाळगण्याचे आव्हान करण्यात आले. महापालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेऊन हा कचरा हटवावा आणि येथे कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी पिंपळे गुरवकर करत आहेत : सुरेश सकट सामाजिक कार्यकर्ते
“गेल्या चार दिवसांपासून कचऱ्याचे ट्रक उपलब्ध होत नाहीत. दिवसा छोट्या गाड्या लावल्या तर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अनेकदा वाहतूक ठप्प होत आहे. त्यामुळे पहाटे पाच ते सात या वेळेत ट्रॅक मध्ये कचऱ्याचे ढिगारे उचलून भरण्यास सोयीस्कर होते. ट्रॅक उपलब्ध होताच येथील कचऱ्याचे ढिगारे उचलून स्वच्छता करण्यात येईल.”
– रश्मी तुंडलवार, आरोग्य निरीक्षक, ड क्षेत्रीय कार्यालय






