Pimpri Chinchwad BJP: पिंपरी भाजपला मोठा धक्का! पक्षांतर्गत वादातून ‘या’ बड्या नेत्याला कोअर कमिटीतून डच्चू
Pimpri Chinchwad BJP: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाचा हस्तक्षेप; कोअर कमिटीत खांदेपालट.

Pimpri Chinchwad BJP – कोअर कमिटीत १४ जणांचा समावेश आहे. यामध्ये पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, पक्षाचे प्रभारी भरत पाटील, शहर कार्यकारिणी सरचिटणीस वैशाली खाडये, मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, विकास डोळस, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांचा समावेश आहे.
तर पक्षनेते प्रशांत शितोळे यांना डच्चू मिळाला आहे. शहर पातळीवर पक्षाचे धोरण ठरवणे, संघटनात्मक निर्णय घेणे आणि पक्षांतर्गत शिस्तपालन असे अधिकार कमिटीला आहेत. कोअर कमिटीच्या मान्यतेशिवाय किंवा चर्चेविना पदाधिकारी व नगरसेवकांनी कोणत्याही विषयावर माध्यमांसमोर किंवा जाहीरपणे प्रतिक्रिया देऊ नये, असा नियम आहे.
महापालिकेचे कामकाज किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार कमिटीला आहे. पक्षासाठी व संघटनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे योगदान पाहूनच त्यांना महत्त्वाची पदे किंवा जबाबदाऱ्या देण्याचा अधिकार कमिटीला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील कामकाजातील पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील गोंधळामुळे सत्ताधारी भाजपची बदनामी होत आहे.
पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. या प्रकाराची भाजप प्रदेश समितीने दखल घेतली आहे. त्यानुसार कोअर कमिटीत काही बदल केल्याची व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याची चर्चा आहे. तर, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे कोअर कमिटीतून बाजूला करत बाकी पदाधिकाऱ्यांना बळ दिल्याचे बोलले जात आहे. तसेच शहर पातळीवर वाढलेले गट झाकण्यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी केलेला हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल मतभेद वारंवार समोर आले आहेत. महापालिकेच्या प्रत्येक कारभारात या गटा-तटाच्या राजकारणामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्याची दखल घेत हे गट-तट झाकण्यासाठी आणि काही जणांना आवर घालण्यासाठी भाजपच्या पक्षनेतृत्वाने कोअर कमिटीमध्ये बदल केले आहेत. त्यामध्ये सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांना कोअर कमिटीमधून डच्चू दिला आहे.
“मला पक्ष जी जबाबदारी देईल ती कर्तव्य म्हणून मी पार पाडेल. पक्षाचा आदेश मला बांधिल आहे. पक्ष जसा आदेश देईल त्या पद्धतीने मी काम करणार आहे.”
– प्रशांत शितोळे, सत्तारुढ पक्षनेते.





