Pimpri News: ‘महापालिका ठरतेय अपयशी एमआयडीसीकडे जबाबदारी द्या’
Pimpri News: फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनची मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी : – शहरातील एमआयडीसी परिसरातील उद्योगांना रस्ते, पथदिवे, ड्रेनेज, पावसाळी पाणी निचरा, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका सातत्याने अपयशी ठरत असल्याचा आरोप फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केला आहे.
त्यामुळे औद्योगिक परिसरातील मूलभूत सुविधांची संपूर्ण जबाबदारी महापालिकेकडून काढून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी ) सोपवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
भोसरी एमआयडीसी परिसरातील उद्योगांकडून महानगरपालिकेला मालमत्ता कर व विविध करांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असतानाही त्या तुलनेत मूलभूत सुविधा मिळत नसल्याने उद्योजकांमध्ये नाराजी आहे.
रस्त्यांची दुरवस्था, अपुरी पथदिवे व्यवस्था, तुंबलेले ड्रेनेज, पावसाळ्यात साचणारे पाणी आणि वेळेवर न होणारा कचरा उठाव या समस्या सातत्याने भेडसावत आहेत. उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र उद्योग कक्ष स्थापन केला होता. मात्र गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून या कक्षाची नियमित बैठक झालेली नसल्याने उद्योजकांच्या समस्या प्रलंबित राहत असल्याची खंत भोर यांनी व्यक्त केली.
औद्योगिक परिसरातील समस्यांवर कारवाई करताना कधी महापालिका तर कधी एमआयडीसीकडे पाठविले जात असल्याने जबाबदारी निश्चित होत नाही आणि तक्रारींचा निपटारा लांबतो. रस्ते, ड्रेनेज, पथदिवे, कचरा व्यवस्थापन व पाणी निचरा यांसह औद्योगिक परिसरातील मूलभूत सुविधांची जबाबदारी एमआयडीसीकडे एकाच प्राधिकरणाच्या स्वरूपात द्यावी.
सुविधांचा अभाव कायम राहिल्यास उत्पादन, वाहतूक आणि कामगारांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्यासोबतच उद्योगांचे इतर औद्योगिक क्षेत्रांकडे स्थलांतर वाढून रोजगार व स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसण्याची शक्यता आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी, उद्योग विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलवावी, औद्योगिक परिसरातील मूलभूत सुविधांसाठी स्पष्ट जबाबदारी निश्चित करावी आणि कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी अभय भोर, अध्यक्ष – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन यांनी केली आहे.





