PCMC News: नेतृत्वाने कान टोचताच पिंपरी भाजपला ‘उपरती’; घाईघाईत नियमबाह्य सभा घेण्याचा खटाटोप?
PCMC News: ७ दिवसांच्या नोटीस नियमाचे उल्लंघन; स्थायी समिती आणि महापौरांच्या पत्रावरून नियमबाह्य कामकाजाचा विरोधकांचा आरोप.

PCMC News – पिंपरी चिंचवड महापालिकेची २० ऑगस्ट रोजीची सर्वसाधारण सभा सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घालत बंद पाडली. ती सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. मात्र, प्रदेश पातळीवरील नेत्यांनी या कारभाराचा समाचार घेतल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपला उपरती झाली आहे. आता येत्या २ सप्टेंबरला ही सभा बोलाविली आहे.
मात्र, ही सभा घेताना नियम आणि सभाशास्त्राकडे दुर्लक्ष करत नियमबाह्य सभा घेण्याचा खटाटोप सुरू असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या ऑगस्ट महिन्याच्या मासिक सभेसमोर शहरातील मेट्रो, ईआरटीएस, पार्किंग व शौचालय धोरणासारखे महत्त्वाचे प्रस्ताव होते. मात्र, सत्ताधारी नगरसेवकांनीच गोंधळ घालून ती सभा थेट १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
शहराचे महत्त्वकांक्षी प्रकल्प आणि प्रश्नांवर चर्चा सोडून कामकाज बंद पाडणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली. भाजप प्रदेश नेतृत्त्वानेही स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. दरम्यान, स्थायी समितीने तहकूब सभेतील ई-आरटीएस वाहतूक व्यवस्था सुरू करणे, निगडी ते चाकण मेट्रो डीपीआर, पार्किंग धोरण आणि शौचालय धोरण आदी महत्त्वाचे विषय नजीकच्या सभेत मान्यतेसाठी घेण्याचा सदस्य पारीत ठराव केला.
महापौर रवि लांडगे यांनी नगरसचिव विभागाला पत्र देत २ सप्टेंबरला मासिक सभा घेण्यास सांगितले. त्यानुसार नगरसचिव विभागाने सभा बोलावली असून तहकूब सभेतील काही प्रस्ताव या सभेच्या विषयपत्रावर घेतले. मात्र, तहकूब सभेतील प्रस्तावांना अशा पध्दतीने मान्यता देता येते का, असा प्रश्न उपस्थित झाला. दुसरीकडे महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सभेची नोटीस किमान पूर्ण सात दिवस अगोदर दिली पाहिजे, असा नियम आहे.
त्याचेही पालन नगरसचिव विभागाने केले नसल्याचे दिसते. केवळ सत्ताधाऱ्यांच्या मर्जीखातर प्रशासन देखील नियमांना तिलांजली देत आहे. सत्ताधारी आणि प्रशासन मिळून नियमबाह्य सभा घेण्याचा खटाटोप करत असल्याचे यावरून पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता भाजपच्या या कारभारामुळे सत्ताधारी भाजप टीकचे धनी होऊ लागले आहे.
नियमामध्ये तरतूदच नाही
महापालिकेच्या २० ऑगस्टच्या तहकूब सर्वसाधारण सभेत ३७ विषयांपैकी एकाही विषयांवर निर्णय झाला नाही. त्या सभेतील मोजकेच प्रस्ताव वेगळे करून ते आधी बोलावलेल्या सभेत घेऊन त्यावर निर्णय घेण्याचा खटाटोप करण्यात येत आहे. ही कार्यवाही स्थायी समिती व महापौरांचे पत्र या आधारे केली जात आहे. परंतु, नियमात तहकूब सभेतील प्रस्ताव इतर सभेत मंजूर करण्याबाबतची कोणतीही तरतूद नाही.
महापौरांनी दिलेल्या पत्रानुसार सर्वसाधारण सभा २ सप्टेंबरला बोलावली असून तहकूब सभेतील विषय दाखल करून घेण्यात आले आहेत. तसेच, त्यानुसार सभेचे कामकाज केले जाईल.
– मुकेश कोळप, नगरसचिव, पिंपरी-चिंचवड महापालिका






