पिंपरी | समस्यांच्या मध्यभागी असलेला पिंपरी विधानसभा मतदारसंघ

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी शहराची ओळख, जुना भाग असलेला मतदारसंघ म्हणजे पिंपरी मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ सार्या समस्यांच्या मध्यभागी आहे.
अपुरी पार्किंग व्यवस्था, अरुंद रस्ते, फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी या नित्याच्या समस्या असून, शहरातील अनेक महत्वाची कार्यालये व बाजारपेठ याच भागात आहेत.
भारताची फाळणी झाल्यानंतर सिंध प्रांतातून या भागात निर्वासित म्हणून वास्तव्यास आलेल्या सिंधी बांधवांच्या व्यापारी दृष्टीकोनातून या मतदार संघाने जिल्ह्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र अशी ओळख तयार केली आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेत 2009 पासून हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतर होणारी ही चौथी विधानसभा निवडणूक आहे. आतापर्यंत दोनवेळा राष्ट्रवादी तर एकदा शिवसेनेच्या पाठिशी हा मतदार संग राहिला आहे.
पिंपरी कॅम्प ही शहरातील मुख्य बाजारपेठ या मतदारसंघांतर्गत येते. तीन विधानसभा मतदारसंघांपैकी पिंपरी मतदारसंघाला विशेष महत्त्व आहे.
या विधानसभा मतदारसंघाने शहराला आजवर अनेक महापौर, महापालिका स्थायी समितीचे सभापती, आमदार व राज्यमंत्री दिले आहेत.
त्यामुळे राजकीयदृष्ट्या या विधानसभा मतदारसंघाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. शहराच्या राजकारणाचे एकेकाळी केंद्र राहिलेला हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असला, तरी विकासाच्या बाबतीत फारसा पुढे जाऊ शकलेला नाही.
पिंपरी कॅम्प हा दाट लोकवस्तीचा भाग असून, सध्या या भागाच्या पुनर्विकासाच्या विविध योजना पुढे आल्या आहेत. अनुसूचित जातीचे प्राबल्य व संमिश्र लोकवस्ती असलेला हा मतदारसंघ कायमच शहराच्या राजकारणाचे केंद्र राहिला आहे.
या मतदार संघाची व्याप्ती सर्वसाधारणपणे निगडी, चिंचवड, आकुर्डी, पिंपरी, संत तुकारामनगर, कासारवाडी, दापोडी, व बोपखेल या भागात आहे.
शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या या भागाच्या मुख्य समस्या पार्किंग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे या आहेत. अरुंद रस्ते आणि रोजची तुडुंब गर्दी यामुळे जीव नकोसा करणारी वाहतूक कोंडी पाचवीलाच पुजली आहे.
शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, ऐतिहासिक ठिकाणे, महत्वाची बसस्थानके, सरकारी कार्यालये, विविध धर्मांची प्रार्थनास्थळे, व्यापारीपेठ असा सारा पसारा याच भागात एकवटला आहे.
शहराची मुख्य बाजारपेठ असल्याने प्रत्येक सणाला या भागात प्रचंड गर्दी उसळते, पण पार्किंगची सुविधाच नसल्याने सणासुदीला रस्त्यावर तगडा बंदोबस्त ठेवण्याची वेळ प्रशासनावर येते.
या मतदारसंघात प्रामुख्याने बाजारपेठेचा भाग येत असल्याने, पार्किंगची तोकडी संख्या, अरुंद रस्ते, त्यावर उभा राहणारे फेरीवाले, सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता, डीपी रस्त्यांचे रखडलेले रुंदीकरण, अतिक्रमण, काही वॉर्डांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अशा समस्या आहेत.
मतदारांची संख्या
एकूण मतदार- 3 लाख 87 हजार 973
पुरुष मतदार 1 लाख 85 हजार415
महिला मतदार- 2 लाख 2 हजार 524
सैनिक मतदार 975
तृतीयपंथी मतदार – 34 एवढी आहे.





